मुंबईतील पायधुनी परीसरात सोमवारी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात या कुटुंबाने रात्री उशिरा बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. कलिंगडमुळे विषबाधा झाल्यामुळे चौघांना उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला. तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणात कुटुंबातील चौघांचा व्हिसेरा घेतला असून अहवाल अद्याप समोर आलेला नाही. असं असताना या प्रकरणानंतर कलिंगड खाण्याबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. कलिंगड खाल्यामुळे विषबाधा झाली का?असाही प्रश्न विचारला जात आहे. अशावेळी कलिंगड कापताना फेस का येतो? त्यामागचं कारण काय?
कलिंगड कापताना फेस का येतो?
काही वेळा कलिंगड कापताना त्यामधून फेस येतो. यामागचं कारण काय? कॅल्शियम कार्बाइड नावाचं जीवघेणं रसायन कलिंगड लवकर पिकवण्यासाठी वापरलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे असं कलिंगड खाल्लं तर पोटाला आणि त्वचेवर याचे विपरीत परिणाम होतात. एवढंच नव्हे तर तब्बेत बिघडण्याचे हे प्रमुख कारण ठरु शकतं? तज्ञांनी सांगितलं की, कलिंगड कापताना फेस आला की, तात्काळ कलिंगड फेकून द्या.
कलिंगडातून फेस येण्यामागचं कारण काय?
कलिंगड कापताना जो फेस येतो याचा अर्थ त्या कलिंगडावर किण्वन म्हणजे Fermentation ची प्रक्रिया झाल्याचं लक्षण आहे. हे फळ आतून खराब असल्याच लक्षण आहे, असं तज्ञांनी सांगितलं आहे.
कलिंगड जास्त दिवस साठवून ठेवू नये. कारण यामुळे तो खराब होतो आणि त्यातील साखरेचे आणि पाण्याचे रूपांतर बॅक्टेरियामुळे कार्बन डायऑक्साइड (gas) मध्ये होते, ज्यामुळे फेस तयार होतो. त्यामुळे कलिंगड आणल्यावर तात्काळ खावा.
रसायनांचा वापर
कलिंगड लवकर पिकवण्यासाठी किंवा तो लाल भडक दिसण्यासाठी नायट्रेट, ऑक्सिटोसिन किंवा कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. या रसायनांमुळे कलिंगड कापताना फेस येतो.
शरीरावर काय परिणाम होतो
अशा पद्धतीचा फेस येणारा कलिंगड खाल्यास पोट खराब होणे, उलट्या होणे यासारखा त्रास होतो. विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. उन्हाळ्यात पोटाला हलका आहार द्यावा अशावेळी खराब कलिंगड खाल्ल्यास त्रास होतो.
कलिंगड कधी खावा?
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कलिंगड हा उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ला जातो. कलिंगड खाताना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. जसे की, सकाळी नाश्ता किंवा दुपारीच्या जेवणानंतर आणि संध्याकाळच्या नाश्तापर्यंत कलिंगड खावे. कलिंगड रात्री जेवणानंतर किंवा उशिरा खावू नये.
