मुंबईतील प्रसिद्ध वाडिया रुग्णालयावर एका आईने धक्कादायक आरोप केला आहे. या रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे चार महिन्यांचा बाळाचा मृत्यू झाला आरोप एका आईने केला आहे. मृत मुलांचं नाव शिवांश असून त्याच्या आईचं नाव अर्चना पाटील आहे. अर्चना पाटील यांनी हा आरोप केला असून त्यांनी भोईवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. त्यासोबतच या आईने आपल्या चिमुकल्याच्या मृत्यूबद्दल न्याय मागण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री एवढंच नाही तर मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवली आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
अर्चना पाटील या अंबरनाथला राहतात. त्यांचा चार महिन्यांच्या शिवांशची प्रकृती खालावली म्हणून कल्याणमध्ये त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथल्या डॉक्टरांनी त्याला वाडिया रुग्णालयात जाण्यास सांगितलं. वाडियामध्ये गेल्यानंतर बाळाची अनेक तपासणी करण्यात आल्यात. त्यात शिवांशला टीबी असल्याचे रिपोर्टमधून समोर आले. त्याला बाळाला औषधं देऊन घरी पाठवण्यात आले. मग 29 मार्चला शिवांशला पुन्हा खूप त्रास व्हायला लागला. त्यानंतर अर्चना पुन्हा वाडिया रुग्णालयात आली. यावेळी डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करुन घेतलं.
पण आपल्या बाळावर वरिष्ठ डॉक्टर नाही तर शिकाऊ डॉक्टरांनी आणि नर्सने उपचार करण्यास सुरूवात केली असं अर्चनाने सांगितलं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या चार महिन्याच्या शुवांशच्या छातीत आणि गळ्यात नळ्या बसवण्यात आल्या होत्या. अर्चनाने सांगितलं की, बाळाच्या डोक्यातून रोज रक्त काढण्यात येतं होतं.
धक्कादायक म्हणजे बाळाला ऑपरेशननंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हा दोन वेळा व्हेंटिलेटर स्पार्क झाला आणि ऑक्सिजन बंद पडला होता, असं अर्चना हिने सांगितलं. 13 दिवस आयसीयूमध्ये असताना बाळाने एकदाही डोळे उघडले नाही. तर आपल्या मुलाला गमावलेल्या अर्चनाने रुग्णालयावर असाही आरोप केला आहे की, त्याच्या अंगात टाकलेल्या नळ्या खराब होत्या. अशा सगळ्यामध्ये 10 एप्रिलला शुभांशचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अर्चनाने व्हिडीओ काढल्यावर रुग्णालय प्रशासनाने धमकी दिल्याचा आरोप अर्चनाने केला आहे.
