प्रवासी जहाजात असतानाच तांत्रिक बिघाड, मुंबई-मांडवा रो-रो फेरी ऐनवेळी रद्द; सुट्ट्यांमध्ये प्रवाशांचा खोळंबा

मुंबई ते मांडवा दरम्यान धावणारी सकाळी 8 वाजताची रो-रो फेरी आज ऐनवेळी तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. विशेष म्हणजे अनेक प्रवासी आपल्या वाहनांसह आधीच जहाजावर चढलेले असतानाच ही अडचण निर्माण झाल्याने बंदर परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, फेरी सुटण्यापूर्वी जहाजाचा रॅम्प बंद होत नसल्याची समस्या अचानक समोर आली. सुरुवातीला नेमकी अडचण काय आहे, याची माहिती प्रवाशांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे सुमारे २० मिनिटे प्रवासी संभ्रमावस्थेतच जहाजावर थांबून राहिले. काही प्रवाशांनी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता स्पष्ट उत्तर न मिळाल्याने नाराजीही व्यक्त केली जात होती.

अर्धा तास वाट बघूनही अपयश

दरम्यान, जहाजावरील अभियंते तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रॅम्प प्रणालीत तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने जहाज सुरक्षितपणे सुटणे शक्य नव्हते. अभियंत्यांनी जवळपास अर्धा तास विविध उपाय करूनही बिघाड दूर करण्यात अपयश आले.

अखेर सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास अधिकृत घोषणा करून मंगळवारची फेरी रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. या घोषणेनंतर प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांचे नियोजन विस्कळीत झाले असून काही प्रवाशांना महत्त्वाच्या कामांसाठी उशीर झाला. प्रशासनाकडून सर्व प्रवाशांना शांततेने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, जहाजावरील सर्व वाहनधारकांना आपल्या गाड्या खाली उतरवून पर्यायी मार्गाने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र अचानक फेरी रद्द झाल्याने पर्यायी व्यवस्था अपुरी पडत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

या घटनेमुळे रो-रो फेरी सेवेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार पुढे येत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सेवा पुरवणाऱ्या यंत्रणांनी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *