मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू, सागरी किनारा मार्ग, सी लिंकमुळं पश्चिम उपनगरांपर्यंतचा वेगवान प्रवास, पूर्वमुक्त मार्ग अशी रस्त्यांची उपलब्धता शहरात आहे. मात्र, या रस्त्यांपर्यंत पोहचण्यासाठीचा वेळ? त्याचं काय? दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईत सध्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे, या अडचणींचं स्वरुप म्हणजे तोबा वाहतूक कोंडी. शहरात एकाच वेळी बहुतांश रस्त्यांची कामं, खोदकामं, पुलांची बांधकामं आणि काही पुलांवरील वाहतूक बंद असल्यानं प्रशासनाच्या नियोजनाचे बारा वाजल्याचं चित्र नागरिकांच्या मनस्तापात भर टाकत आहे. शीव अर्थात सायन आणि एल्फीन्स्टन मार्गावरील उड्डाणपूल बंद असल्या कारणानं या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. परळ टी-टी उड्डाण पुलाची एकच मार्गिका सुरू असल्यामुळं रुग्णालयांच्या या परिसरातसुद्धा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच नागरी वस्तीचा परिसर असल्यामुळं आणि चिंचोळ्या रस्त्यांमुळं वाहनांची प्रचंड गर्दी अगदी भर दुपारीसुद्धा इथं पाहायला मिळत आहे.
भायखळा, दादर रेल्वे स्थानकांवरही उड्डाणपुलांचं काम सुरू आहे. ज्यामुळं या परिसरांमध्ये रस्त्यांवर एकीकडे बांधकाम साहित्याचे ढीग, उडणारी धूळमाती आणि सिमेंट यांमुळं नागरिकांचा श्वास गुदमरू लागला आहे. कामाच्या तासांमध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येनं शहरात बाहरे पडणाऱ्या वाहनांमुळं ज्या पुलांच्या मदतीनं शहराच्या मध्य भागातील प्रवासासाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागत होता तोच वेळ आता तासाभरावरही पोहोचत आहे. ज्यामुळं या वाहतूक कोंडीची वेगळीच धास्ती नागरिकांना लागली आहे.
कोणत्या पुलांच्या कामामुळे मुंबईची वाहतूक ठप्प?
- भायखळा (पूर्व) — स्टेशनबाहेर फ्लायओव्हर रुंदीकरणाचं काम सुरू असल्यामुळं पादचाऱ्यांना वळसा घालून प्रवास करावा लागतो.
- परेल टीटी फ्लायओव्हर — या पुलाची उत्तरेकडील बाजू दुरुस्तीसाठी बंद असून. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील उत्तरेकडील बाजूवर काम सुरू.
- एल्फिन्स्टन रोड फ्लायओव्हर —इथं पुनर्बांधणी सुरू, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक खालच्या रस्त्यांवर वळवली गेली आहे.
- सायन पूल — ऑगस्ट 2024 पासून बंद असून, 15 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा. यामुळे दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरांमधील वाहतूक पूर्णपणे प्रभावित झाली आहे.
मुख्य पुलांची ही अवस्था असल्यामुळं वाहनचालक या परिसरांतील अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करत आहेत. ज्यामुळं गल्लीबोळांपासून ते अगदी लहान रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. ज्यामुळं आता पालिका प्रशासन या वाहतूक कोंड़ीवर नेमका काय आणि कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
