महाराष्ट्र उष्णतेने होरपळला! उष्माघातामुळे दोन जणांनी गमावला जीव,

राज्यभरात उन्हाची काहिली वाढली असून, अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशीच्या पलिकडे गेला. सोमवारी उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाला. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात या घटना घडल्या. देशभरात उष्णतेची लाट आल्याने गेल्या चार दिवसांपासून सरासरीच्या तुलनेत सगळीकडे तापमान अधिक नोंदविण्यात येत आहे. महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नाही.

अहिल्यानगरमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या बहिणीला भेटायला भर उन्हात गेलेल्या भावाचा उष्माघातामुळे रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाला. दिगंबर जनार्दन वाकचौरे (४५) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. भर दुपारी कळस येथून संगमनेर येथे बहिणीला भेटायला ते दुचाकीवरून आले होते. उन्हाचा त्रास झाल्याने त्यांनी रुग्णालयात पोहोचल्यावर थंड पाण्याची बाटली डोक्यावर ओतली. मात्र, तेथेच ते चक्कर येऊन पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ४० ते ४१ अंश सेल्सिअस तापमान आहे.

दुसऱ्या घटनेत, जळगाव जिल्ह्यात विवाहसोहळ्याहून आल्यानंतर रात्री घरी न परतलेले लोधू नामदेव पाटील (६०) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी एसटीच्या कार्यशाळेजवळ आढळला. दिवसभर लग्नसोहळ्यात फिरल्यानंतर त्यांना उन्हाचा फटका बसला असावा, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सोमवारी कमाल तापमान ४४.६ अंशावर पोहोचले होते.

पुण्यात पारा ४२ अंशांवर

पुणे शहरात सकाळपासून वाढत गेलेली उन्हाची तीव्रता, उष्णतेच्या झळा आणि घामाच्या धारांनी पुणेकर सोमवारीही हैराण झाले. रविवारी उन्हाने वातावरण तापले होते, रात्री उकाड्याने असह्य झाले आणि सोमवारीही हेच वातावरण अनुभवायला मिळाले. शहरात ३९.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले, तर शिवाजीनगर येथे या हंगामातील उच्चांकी २४.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *