मुंबईवरुन सोलापूरला निघालेली ‘ वंदे भारत एक्स्प्रेस ’ (गाडी क्रमांक २२२२५) पुणे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर प्रवेश करताना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घसरली होती. त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेवर मोठा परिणाम झाला. अखेर जवळपास सात तासांनी, मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घसरलेली वंदे भारत यार्डात नेण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे.
रेल्वे रखडल्या, प्रवासी भडकले
रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे रात्रभर युद्धपातळीवर काम सुरु आहे. वंदे भारतच्या अपघातामुळे पुण्याला येणाऱ्या-जाणाऱ्या आणि पुणेमार्गे वाहतूक करणाऱ्या रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला. अनेक ट्रेन रखडल्यामुळे किंवा रद्द झाल्यामुळे प्रवासी पुणे रेल्वे स्थानकावरच अडकून पडले. वेळेवर उद्घोषणा होत नसल्याची खदखदही काही जणांनी व्यक्त केली. वाढत्या उकाड्यात रेल्वेच्या दिरंगाईमुळे अनेक प्रवाशांचा विचका झाला.
पहिल्यांदाच वंदे भारत घसरली
सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता डायमंड क्रॉसिंगवर ‘सी १५’ या डब्याची पुढील चाके रुळावरून घसरली. त्यामुळे पुणे स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. घसरलेला डबा रुळावर आणण्यास वेळ लागत असल्याने सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या गाडीतून पाठवण्यात आले. वंदे भारत एक्स्प्रेस देशात सुरू झाल्यापासून प्रथमच ती रुळावरून घसरली.
डबे घसरण्याचे कारण समोर
मुंबईहून नेहमीच्या वेळेत सुटलेली वंदे भारत पुणे स्थानकावर वेळेत पोहोचली होती. ती फलाट क्रमांक तीनकडे जात असताना डायमंड क्रॉसिंगवर पुढील बाजूची चाके घसरली. डायमंड क्रॉसिंग म्हणजे दोन रेल्वे मार्ग एकमेकांना काटकोनात छेदतात ती विशेष रचना. पुणे स्थानकावर यार्ड रिमॉडलिंगच्या अंतर्गत येथील क्राॉसिंगच्या अपग्रेडचे काम सुरू होते. यामुळे डबे घरल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वंदे भारतच्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर गाडी तत्काळ थांबवली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. गाडी मार्गावर आणण्यास वेळ लागणार असल्याने दुसऱ्या गाडीने प्रवाशांना सोलापूरकडे पाठवले गेले.
