सोमवार ठरला ‘ब्लॅक मंडे’; भीषण अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल सोमवारी अपघातांचे दुर्दैवी सत्र पाहायला मिळाले. वैजापूर, करमाड आणि बिडकीन परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे संबंधित गावांवर शोककळा पसरली असून वाढत्या रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त होत आहे.

पहिली घटना:

वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव बु. येथील दोन तरुण दुचाकीने काल सोमवारी मालेगाव येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास नांदगाव जवळील वखारी गावातील वळणावर एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत सलमान नूरमोहम्मद शेख (वय 33) यांचा जागीच मृत्यू झाला, तर रियाज गयास शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. सलमान यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे.

दुसरी घटना:

दुसरी घटना करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लहुकी फाटा येथे घडली. वरुड काजी येथील रहिवासी जगन्नाथ रावसाहेब दांडगे (वय 36) हे काल सोमवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून एम.एच. 20 एच.जे. 6785 शेतातून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जगन्नाथ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि आई-वडील असा परिवार असून वरुड काजी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

तिसरी घटना:

बिडकीन-पैठण महामार्गावर हॉटेल पार्वतीसमोर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एक भरधाव रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. यामध्ये रिक्षातील प्रवासी छाया जनार्दन कोथिंबिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच अपघातात मंगल विलास कोथिंबिरे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच परिसरात दुसऱ्या एका घटनेत दोन दुचाकींच्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *