नातेवाईकांसोबत आधी बिर्याणी मग चौघांनी कलिंगड खाल्लं, अचानक प्रकृती बिघडली; मुंबईत चौकोनी कुटुंबाचा हृदयद्रावक अंत

मुंबईतील एक मोठी घटना समोर आली आहे. विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत झाला आहे. मुंबईतील पायधूनी परिसरातून ही घटना समोर आली आहे. मृतांमध्ये मृतांमध्ये आई-वडील, 13 आणि 16 वर्षीय मुलींचा देखील समावेश आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नातून विषबाधा झाल्यामुळे या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाने त्यांच्या नातेवाईकांसह रात्री जेवण केलं होतं, आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर ते त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांकडे गेले असता त्यांनी जे.जे रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

अन्नाचे घेतलेले अंश वैद्यकीय विश्लेषणासाठी

मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं की, त्यांनी सर्वांनीसोबत आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं होतं. या प्रकरणात पोलिसांच्या मते, मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मृतांची नावं अब्दुल्ला डोकाडिया (वय 40), नसरीन डोकाडिया (वय 35) आणि त्यांच्या मुली आयशा (वय 16) व झैनब (वय 13) अशी आहेत. दरम्यान, रुग्णालयात आले तेव्हा त्या चौघांची शुद्ध हरपलेली होती. अन्नातून विषबाधा झाल्याचीच शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतड्यातील अन्नाचे घेतलेले अंश वैद्यकीय विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.

पायधुनी परिसरातील घाटी गल्ली येथील मुघल इमारतीमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबीयांनी शनिवारी रात्री कलिंगड खाल्लं. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणं जाणवू लागली. त्यानंतर काल रविवारी त्यांची तब्येत जास्त बिघडली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. चौघांनाही तत्काळ जे.जे रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. चारही पार्थिवांचं शवविच्छेदन करण्यात आलं असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे.

आज सोमवारी पहाटे मुंबई शहरात एक भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मरीनड्राईव्ह परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका वृद्ध व्यक्तीला दोन बाईकस्वारांनी धडक दिली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती, एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला? याचा संपूर्ण तपशील समोर आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *