७२ वर्षीय योग शिक्षिका मंगला केवते यांच्या मृत्यूप्रकरणी नागपूर शहर पोलिसांनी आरोपी कार चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून अपघातग्रस्त कारही जप्त करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी धरमपेठ परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धेला कारने धडक दिल्यानंतर पोलीस तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
कुत्र्यांना घाबरुन पळाल्या
पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं की, मंगला केवते या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होत्या. त्यावेळी काही मोकाट कुत्र्यांनी जोरात भुंकण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या केवते मुख्य रस्त्याच्या दिशेने धावल्या. त्याच क्षणी आशिष यादव भरधाव वेगाने चालवत असलेल्या इनोव्हा कारने मंगल केवतेंना आपल्या चाकांखाली चिरडलं.
या घटनेमुळे मोकाट कुत्र्यांबद्दल बऱ्याच काळापासून तक्रार करणाऱ्या स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक रहिवाशांनी बेदरकार वाहन चालवण्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याची आणि परिसरातील कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.
