महापालिकेचं नियोजन फसलं, भायखळा ते शीव एकाच वेळी 5 महत्त्वाचे पूल बंद; 10 मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास वेळ

शहरांत सध्या अनेक मार्गांवर विकासकामे सुरू आहेत. यावेळी मुंबईतील प्रवास सोपा आणि कोंडीमुक्त करण्याचे आवाहन दिले जात असले तरी याच कामांमुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. सध्या मध्य आणि पूर्व मुंबईत एका वेळी पाच पुलांवर बांधकाम किंवा दुरूस्तीचं काम सुरू आहे. यामुळे शहरांतील वाहतुकीची व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागतो.

शीव आणि एल्फिनस्टन रोडवरील उड्डाणपूल बंद

शीव आणि एल्फिनस्टन रोडवरील उड्डाणपूल बंद झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता दुसरीकडे वळवण्यात आली आहे. त्यासह परळ टीटी उड्डाणपूलही दुरुस्तीच्या कामांसाठी अर्धवटच खुला ठेवण्यात आला असून या मार्गांवरील वाहतूक पुढे आधीच कोंडी असलेल्या मार्गांवर वळवण्यात आली आहे. हे रस्ते अरुंद असून वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे संथ गतीने वाहतूक सुरू राहते. दरम्यान, भायखळा आणि दादर रेल्वे स्थानकांवरही सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावर सतत बांधकामासाठी लागणारं साहित्य पडलेलं असतं. त्यामुळे रस्त्याकडेने चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून तीव्र वाहतूक कोंडी होते. दरम्यान, भायखळा उड्डाणपुलाखालील एक महत्त्वाचा पादचारी रस्तासुद्धा बंद करण्यात आला आहे.

शीव येथील रेल्वे पुलाचं काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे तेव्हा शीवमधील कोंडी फुटण्याचे संकेत आहेत. परंतु, इतर काही मार्गांवर या समस्या आणखी काही काळ कायम राहतील. भायखळा पूर्वेत रेल्वे स्थानकाजवळच उड्डाणपुलाच्या विस्ताराचं काम सुरू आहे. इथे पादचाऱ्यांना फिरून प्रवास करावा लागतो. त्यापुढेच परळ टीटी उड्डाणपुलाची एक बाजू बंद असून एल्फिन्स्टन पुलाची पुनर्बांधणी सुरू आहे. दरम्यान, शीव उड्डाणपूल बंद असल्यामुळे दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरातील कनेकटीव्हीटीवर मोठा परिणाम झाला आहे. दक्षिण मुंबईतील प्रवासी शीव आणि परळ उड्डाणपुलाचा मोठ्या संख्येने वापर करतात. त्यामुळे दोन्ही पुलांचं बांधकाम महापालिकेने एकाच वेळी हाती घेतल्यामुळे प्रवाशांचे दररोज हाल सुरू आहेत.

परळ येथे नागरिकांचा हाल

परळ टीटी उड्डाणपुलावर, बाबासाहेब आंबेडकर मार्गाच्या उत्तरेकडील बाजूचे काम सध्या सुरू आहे. दादरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना परळ टीटी येथील ‘स्लिप रोड’वर वळवले जात आहे. हा स्लिप रोड अरुंद असून, त्यावर मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक सामावून घेणे शक्य होत नाही. सायंकाळी 4 ते रात्री 19 या वेळेत उत्तरेकडील मार्गावर सर्वाधिक वाहतूक असते, असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कालावधीत, स्लिप रोडचा वापर करण्यासोबतच, उत्तरेकडील वाहतूक उड्डाणपुलाच्या दक्षिणेकडील मार्गिकेवरून वळवली जाते आणि त्यानंतर हिंदमाता येथे पुन्हा उत्तरेकडील मुख्य मार्गावर सोडली जाते

उत्तरेकडील बाजूचे काम कदाचित पुढील आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता असल्याने, पोलीस सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत दक्षिणेकडील वाहनांना वळवण्यासाठी उत्तरेकडील मार्गिकेचा वापर करतील. टिळक पुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी अवजड वाहनांना या पुलावरून जाण्यास मनाई केली आहे. मोठी वाहने सायन हॉस्पिटल जंक्शनवरून वळवली जात आहेत.

शीव उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे प्रवासाचा वेळ वाढला

शीव उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचा खर्चही 42.7 कोटी रुपयांवरून वाढून आता जवळपास 50 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याच वेळी, मुंबई महानगरपालिकेने (BMC) परेल टीटी उड्डाणपुलाच्या संरचनात्मक बळकटीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. किंग्ज सर्कल आणि शीव परिसरातील रहिवाशांना वांद्रेच्या दिशेने प्रवास करण्यासाठी हा पूल एक अत्यंत महत्त्वाचा दुवा होता. आता, सायन हॉस्पिटलजवळील ’60-फूट रस्ता’ हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे; मात्र या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. धारावी ते बीकेसी (BKC) दरम्यानच्या रस्त्यावर वारंवार वाहतूक ठप्प होते; ज्या प्रवासासाठी केवळ 10 मिनिटे लागणे अपेक्षित असते, त्यासाठी आता 30 मिनिटांपर्यंतचा वेळ लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *