पावसाळ्यात रस्त्याची चाळण होणार! घोडबंदरच्या गायमुख घाटातील समस्या कायम; तासंतास कोंडीत जाणार

पावसाळा आणि घोडबंदरच्या गायमुख घाटातील कोंडी हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून कायम झाले असून यंदाच्या पावसाळ्यातही या पट्ट्यात वाहनचालकांची वाट बिकट होण्याची शक्यता आहे. आधीच अरुंद रस्ता, वन विभागाच्या हद्दीत रस्त्याचे रखडलेले एकत्रिकरण, यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव यामुळे या घाट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना तासन्तास कोंडीत अडकावे लागते. या दुरवस्थेपायी अपघातांमध्ये नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. तरीही प्रशासकीय व राजकीय पातळीवरील अनास्थेमुळे या मार्गाच्या वाटेतील अडथळे काही केल्या संपण्याची चिन्हे नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रसत्याची चाळण होणार

घोडबंदर रोडवर गायमुख घाटाचा वापर प्रामुख्याने जेएनपीटीमधून मुंबई-अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी होतो. या घाटातून दहिसर, बोरिवली, मिरा-भाईंदर, वसई – विरार, पालघर, गुजरातच्या दिशेने जाणारी खासगी वाहने, परिवहन सेवेच्या बसचा प्रवास होतो. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या या मार्गावरील घाट रस्त्याची प्रत्येक पावसाळ्यात चाळण होत असल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी, यासाठी विविध पद्धतींचा वापरही पावसाळापूर्व कामांदरम्यान केला जातो.

डांबर, मास्टिक, काँक्रीट, रॅपिड हार्डनिंग काँक्रीट असे विविध प्रयोग याआधीच्या पावसाळ्यात घाट रस्त्यासाठी करण्यात आले. मात्र पावसाच्या माऱ्याने पुन्हा या घाटरस्त्याची दुरवस्था होते. त्यामुळे पावसाच्या चार महिन्यांत या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने अवघ्या काही मिनिटांच्या अंतरासाठी एक ते दीड तास कोंडीत अडकतात. ‘फाऊंटन हॉटेल ते गायमुख घाट’ या पट्ट्यातील रस्त्यावर होणाऱ्या कोंडीतून वाट काढण्यासाठी वाहने विरुद्ध दिशेने प्रवास करतात. त्यामुळे अपघातांची भीती मोठ्या प्रमाणात असते.

यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव

मुख्यत्वे गायमुख घाट रस्त्याचा काही भाग ठाणे व काही भाग मिरा – भाईंदर महानालिकेच्या हद्दीत येतो. याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची डागडुजी करण्यात येत होती. गेल्या वर्षी ठाणे आणि मिरा-भाईंदर महापालिकेला रस्त्याच्या कामाची जबाबदारी देण्यात आली. एमएमआरडीएच्या वतीने भविष्यात या रस्त्यांवर विविध कामे केली जाणार आहेत. येथील काही भाग वनविभागाच्या हद्दीत येतो. त्यामुळे विविध यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव जाणवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *