शहरांत सध्या अनेक मार्गांवर विकासकामे सुरू आहेत. यावेळी मुंबईतील प्रवास सोपा आणि कोंडीमुक्त करण्याचे आवाहन दिले जात असले तरी याच कामांमुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. सध्या मध्य आणि पूर्व मुंबईत एका वेळी पाच पुलांवर बांधकाम किंवा दुरूस्तीचं काम सुरू आहे. यामुळे शहरांतील वाहतुकीची व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागतो.
शीव आणि एल्फिनस्टन रोडवरील उड्डाणपूल बंद
शीव आणि एल्फिनस्टन रोडवरील उड्डाणपूल बंद झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता दुसरीकडे वळवण्यात आली आहे. त्यासह परळ टीटी उड्डाणपूलही दुरुस्तीच्या कामांसाठी अर्धवटच खुला ठेवण्यात आला असून या मार्गांवरील वाहतूक पुढे आधीच कोंडी असलेल्या मार्गांवर वळवण्यात आली आहे. हे रस्ते अरुंद असून वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे संथ गतीने वाहतूक सुरू राहते. दरम्यान, भायखळा आणि दादर रेल्वे स्थानकांवरही सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावर सतत बांधकामासाठी लागणारं साहित्य पडलेलं असतं. त्यामुळे रस्त्याकडेने चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून तीव्र वाहतूक कोंडी होते. दरम्यान, भायखळा उड्डाणपुलाखालील एक महत्त्वाचा पादचारी रस्तासुद्धा बंद करण्यात आला आहे.
