मोबाईल बघण्याच्या नादात गेला तोल; चौथ्या मजल्याहून खाली पडून 17 वर्षीय मुलगा जखमी, प्रकृती चिंताजनक

हातात मोबाइल आणि डोळ्यांत इंटरनेटचे आभासी जग या धुंदीत सभोवतालच्या धोक्याचे भान हरपल्याने शहरात सतरा वर्षीय युवकाचा भीषण अपघात झाला. घराच्या बाल्कनीत मोबाइलवर ‘सर्फिंग’ करताना अचानक तोल गेल्याने हा युवक थेट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

भद्रकाली येथील शिंगाडा तलाव परिसरातील म्हसोबावाडीत राहणारा अरबाज सलीम खान हा रविवारी (दि. २६) सकाळी साडेदहाच्या सुमारास घराच्या बाल्कनीत होता. नेहमीप्रमाणे तो मोबाइलवर इंटरनेट सर्फिंग करण्यात मग्न होता. मोबाइलमध्ये तो इतका हरवून गेला, की त्याला आपण बाल्कनीच्या अगदी कडेला बसलो आहोत, याचेही भान राहिले नाही. त्याच नादात अचानक तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला. खाली पडताना दुसऱ्या मजल्यावरील एका पत्र्याच्या शेडवर तो जोराने आदळला. पत्र्याचा मोठा आवाज आणि अरबाजची आरोळी ऐकताच शेजारी राहणारे ध्रुगेश यादव यांनी तत्काळ धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अरबाजला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
अरबाजच्या डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघातावेळी अरबाजचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. भद्रकाली पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे. प्राथमिकदृष्ट्या मोबाइलमधील मग्नतेमुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *