लेकाचा गंभीर अपघात, ‘ब्रेन डेड’ घोषित; ‘माझा मुलगा दुसऱ्याच्या रुपात जिवंत राहील’, आदिवासी कुटुंबाचा अवयवदानाचा निर्णय

मृत्यू अटळ असला, तरी त्यातूनही अनेकांना नवजीवन देण्याची ताकद ‘ अवयवदान ात’ आहे, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय नाशिक जिल्ह्याने अनुभवला. बागलाण तालुक्यातील गोलवाड येथील अवघ्या १४ वर्षीय विकास यशवंत महालेच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने अवयवदान करीत आदर्श निर्माण केला.

तपासणीनंतर ‘ ब्रेन डेड ’ घोषित

बागलाण तालुक्यातील गोलवाड येथील विकास महाले हा युवक दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर आधी सटाणा येथे नंतर नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तीन दिवस अहोरात्र प्रयत्न करूनही त्याच्या मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याला जीवदान देणे शक्य झाले नाही. अखेर वैद्यकीय तपासणीनंतर त्याला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले.

कुटुंबीयांचा धाडसी निर्णय

अशा कठीणप्रसंगी मविप्र रुग्णालयातील अवयवदान समुपदेशक डॉ. संजय रकिबे यांनी विकासच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करीत अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. मुलाच्या जाण्याच्या असह्य वेदनांमध्येही कुटुंबीयांनी अत्यंत धाडसी निर्णय घेत अवयवदानाला संमती दिली. या निर्णयानंतर प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या माध्यमातून त्याच्या अवयव वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

नाशिक-पुण्यात अवयवदान

शुक्रवारी रात्री ११ वाजेपासून ते शनिवारी सकाळपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. विकासचे दोन मूत्रपिंड आणि यकृत ग्रीन कॉरिडॉर तयार करून पुणे येथील विविध रुग्णालयांत पाठविण्यात आले. तसेच त्याचे दोन्ही डोळे नाशिकमधील नेत्रपेढीत, तर त्वचा त्वचापेढीत दान करण्यात आली.

माझा मुलगा दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहील

आपला मुलगा आता कधीच डोळे उघडणार नाही, हे सत्य पचवणे कोणत्याही आई-वडिलांसाठी डोंगर कोसळण्यासारखे असते. मात्र, अशाही परिस्थितीत डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव दान समुपदेशक डॉ. संजय रकिबे यांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. विज्ञानाची मोठी पदवी नसली तरी, ‘माझा मुलगा दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहील‘ हा विचार करीत या आदिवासी कुटुंबाने अवयवदानाला संमती दिली. त्यांचा हा निर्णय समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *