पुण्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे मशरूम तयार करणाऱ्या कंपनीत सांडपाण्याची टाकी स्वच्छ करताना तीन कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पिंटू राजेश प्रसाद (वय 23), व्यास सोहम कुमार (वय 22) आणि गौतम रामसुरन कुशवाहा (वय 36, सर्व रा. रुद्रपुर, जि. देवरिया) अशी मृतांची नावं आहेत.
नेमकी घटना कशी घडली?
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेलसर येथील वाडा अॅग्रो मशरूम कंपनीमध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून उत्पादन सुरू होते. कंपनी परिसरातील सुमारे पाच बाय पाच फूट आकाराच्या सिमेंटच्या टाकीत मशरूम प्रक्रियेदरम्यान सांडपाणी साठवले जात होते. ही टाकी स्वच्छ करण्यासाठी एक कामगार आत उतरला; मात्र टाकीत साचलेल्या विषारी वायूमुळे त्याचा श्वास गुदमरला. हा प्रकार लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार टाकीत उतरला, परंतु त्याचाही श्वास गुदमरला. त्यानंतर कंपनीचा ठेकेदार स्वतः दोघांना बाहेर काढण्यासाठी खाली उतरला; मात्र त्यालाही विषारी वायूचा फटका बसून तोही बेशुद्ध झाला.
अनेक दिवसांपासून स्वच्छता नाही
दरम्यान, अन्य कामगारांनी आरडाओरडा करत मदत मागितली. जेसीबीच्या साहाय्याने टाकीचा स्लॅब तोडून तिघांना बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या टाकीत केवळ दोन फूट पाणी होते. मात्र अनेक दिवस स्वच्छता न झाल्याने व मशरूम प्रक्रियेतील रसायनयुक्त पाणी साचल्यामुळे विषारी वायू तयार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का? याबाबतही चौकशी केली जात असल्याची माहिती जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली.
नायब तहसीलदारांचा जागीच मृत्यू
पुण्यातील जुन्नर तालुक्यामध्ये प्रशासनात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा–जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील एस कॉर्नर परिसरात हायवा डंपर आणि होंडा सिटी कार यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
