लग्नाच्या हॉलमध्ये घुसून भटक्या कुत्र्याने 36 जणांचा घेतला चावा; गाईचेही तोडले लचके; दुसऱ्या दिवशी लोकांनी ठेचून केलं ठार

रेबिजची लक्षणं असलेल्या भटक्या कुत्र्याने लग्नाच्या हॉलमध्ये घुसून पाहुण्यांवर हल्ला करत त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्याचा हैदोस इथपर्यंतच थांबला नाही. त्याने रस्त्यावरुन जाणारे नागरिक आणि गाईलाही चावा घेत जखमी केलं आहे. एकूण 36 जणांचा चावा घेत कुत्र्याने जखमी केलं आहे. उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्याच्या बिल्सी भागात ही घटना घडली आहे.

लग्नाच्या हॉलमध्ये एकच धावपळ

सोमवारी सकाळी ही घटना घडली. कुत्र्याने हॉलमध्ये शिरुन चावा घेण्यास सुरुवात केली असता हॉलमध्ये एकच धावपळ सुरु झाली होती. लोकांनी कुत्र्यापासून वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेण्यास सुरुवात केली. आपला बचाव करण्याच्या नादात अनेकांच्या हाताला आणि छातीला जखमा झाल्या. लग्नाच्या हॉलमध्ये घुसण्यापूर्वी कुत्र्याने हेल्मेट विकणाऱ्या एका तरुणावर हल्ला केला होता असं समजत आहे.

स्थानिकांनी कुत्र्याला केलं ठार

मंगळवारी, जेव्हा तो कुत्रा त्याच परिसरात पुन्हा दिसून आला, तेव्हा स्थानिक रहिवाशांनी त्याला मारहाण करून ठार केल्याचं समजत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये प्रौढांची संख्या जास्त आहे. त्यांना उपचारांसाठी ‘बिसावली सामुदायिक आरोग्य केंद्रात’ दाखल करण्यात आलं, असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, या हल्ल्यात कोणत्याही मुलाला दुखापत झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

36 जणांना रेबीज-प्रतिबंधक लस

सामुदायिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वर्मा यांनी सांगितले की, 36 जणांना रेबीज-प्रतिबंधक लस देण्यात आली असून, छातीला गंभीर दुखापत झालेल्या तीन पुरुषांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तथापि, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.

“आम्ही श्वानाने चावा घेतलेल्या 36 जणांना रेबीज-प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला आहे. दुसऱ्या डोससाठी त्यांना तीन दिवसांनी परत बोलावलं आहे. उपचारांच्या संपूर्ण प्रक्रियेचा भाग म्हणून प्रत्येक रुग्णाला लसीचे पाच डोस दिले जातील,” असं डॉ. वर्मा यांनी सांगितंल आहे.

रहिवाशांचा मोकाट कुत्र्यांविरोधात आंदोलन

दरम्यान संतप्त रहिवाशांनी याप्रकरणी आंदोलन केलं. तसंच परिसरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी तातडीने मोहीम राबवण्याची मागणी केली. अनुराग वार्ष्णेय या स्थानिक रहिवाशाने सांगितले की, लग्न मंडपात निरोप समारंभ सुरू होता, तेव्हा तिथे जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये त्यांची मावशी रंजना वार्ष्णेय (47) यांचाही समावेश होता.

जेव्हा लोकांनी कुत्र्याला दूर पळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो अधिक आक्रमक झाला आणि हल्ला करण्यास सुरुवात केली. यामध्ये माझी मावशीही होती असं अनुराग नावाच्या विद्यार्थ्याने सांगितलं.

बदाऊनचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. समदर्शी सरोज यांनी सांगितले की, तो कुत्रा रेबीजने बाधित असल्याचे दिसून आले आणि बिल्सी परिसरात घडलेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या घटनेच्या संदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *