नेस्को ड्रग्ज मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून दररोज धक्कादायक खुलासे केले जात आहेत. ड्रग्ज पुरवठादारांच्या साखळीमध्ये आयुष साहित्य या तरुणाची प्रमुख भूमिका असल्याचे तपासातून समोर आले आहे. मुंबईहून गोव्याला ड्रग्ज गोळ्यांचा साठा घेऊन जात असताना पोलादपूरनजीक पोलिसांची नाकाबंदी दिसताच त्याने तेथेच ड्रग्जच्या गोळ्या फेकल्या. पोलिसांनी पोलादपूर गाठत सुमारे १५ लाख रुपयांच्या एक्स्टसीच्या ९३३ गोळ्यांचा साठा जप्त केला. तसंच या प्रकरणात आता अभिनय क्षेत्रातील तरुणीचंही नाव समोर आलं आहे.
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सदोष मनुष्यवध, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून ११ आरोपींना अटक केली आहे. कॉन्सर्टमध्ये एकस्टसी गोळ्या विकणाऱ्या आनंद पटेल, विनीत गेरेलानी, शुभ अग्रवाल आणि मुख्य आरोपी आयुष साहित्य या आरोपींनी मिरा-भाईंदर येथील लोढा कासा मॅक्सिमा सोसायटीत राहणाऱ्या जिया रिचेल जेकब हिच्या खात्यावर ४.३७ लाख रुपये वळते केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. जिया अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी धडपडत असून ती स्वतः ११ एप्रिल रोजी नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टमध्ये सहभागी होती. तिनेही एकस्टसीच्या गोळ्यांचे सेवन केले होते.
जियाची पोलिस कोठडीत रवानगी
ड्रग्ज खरेदी-विक्रीचे पैसे सर्वांत शेवटी जिया हिच्या खात्यावर गेल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिला मिरा रोड येथून बुधवारी अटक केली. गुरुवारी तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. अटक सुरक्षारक्षक प्रदीप गुप्ता हादेखील पोलिस कोठडीत असून त्याची मुदत आज, शुक्रवारी संपणार आहे, तर इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
