Condom Prices: कंडोम 30% पर्यंत महाग होऊ शकतात, तेल-गॅसनंतर युद्धाचा आता थेट ‘फॅमिली प्लॅनिंग’ला फटका!

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचा परिणाम आतापर्यंत केवळ गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांपुरता मर्यादित होता. या युद्धामुळे सामान्य लोकांच्या दैनंदिन किचन बजेट विस्कळीत होण्याची शक्यता असून याचा परिणाम कुटुंब नियोजनावरही होऊ शकतो. असं आम्ही नाही तर, जगातील सर्वात मोठी कंडोम उत्पादक कंपनी कॅरेक्सने विधान केले आहे.

युद्धामुळे कंडोम महागणार

इराण युद्धामुळे जगातील सर्वात मोठ्या कंडोम उत्पादक कंपनीच्याही अडचणी वाढल्या आहेत. मलेशियाची कॅरेक्स कंपनी दरवर्षी 5 अब्ज कंडोमचे उत्पादन करते आणि 130 देशांमध्ये निर्यात करते. मात्र, जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे कंपनी आता कंडोमच्या किमती 20 ते 30% वाढवण्याची तयारी करत आहे.होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराण यांच्या नाकेबंदीमुळे कंडोम उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या काही विशिष्ट सामग्रीच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे कंपनीवर दरवाढीची नामुष्की ओढवली आहे.

कंडोमच्या मागणीत वाढ पण, साठा संपला
मालवाहतूक शुल्कात वाढ आणि वितरणातील विलंबामुळे मागणीत मोठी वाढ झाली असून अनेक खरेदीदारांकडील साठा संपत असल्याचे कंपनीचे सीईओ Goh Miah Kiat यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी, परिस्थिती अत्यंत गंभीर असून किमती महागल्या असताना ‘हा खर्च आमच्या ग्राहकांवर लादण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही,’ असेही त्यांनी पुढे सांगितले.

कॅरेक्स, जगातील सर्वात मोठी कंडोम उत्पादक कंपनी, पर्सनल ल्युब्रिकंट्स, ग्लोव्हज, मेडिकल कॅथेटर्स आणि प्रोब कव्हर्सचे उत्पादन करते. तसेच ONE, Trustex, Carex आणि Pasante या ब्रँड नावांनी पुरुष कंडोमचे उत्पादनही कंपनीच्या लिस्टमध्ये आहे. अशा परिस्थितीत, याचे पडसाद भारतासह अनेक देशांमध्ये उमटू शकतात आणि ही परिस्थिती दीर्घकाळ टिकली, तर केवळ किमतीच वाढणार नाहीत, तर काही भागांमध्ये कंडोमचा तुटवडाही निर्माण होऊ शकतो.

युद्धामुळे कंडोम बनवणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा रखडला

सिंथेटिक रबर, नायट्राइल, सिलिकॉन ऑइल आणि पॅकेजिंग साहित्य यांसारखा पेट्रोकेमिकल्सशी संबंधित कच्चा माल मध्यपूर्वेतून पुरवला जातो. युद्धामुळे किमती झपाट्याने वाढल्या असून पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे कंपनीने दरवाढीचे कारण सांगितले असून वाढता वाहतूक खर्च आणि विलंबामुळे बाजारात मालाची कमतरता निर्माण झाली परिणामी, कंपन्या आता किमती वाढण्याचे प्लॅन करत आहे.

गोह म्हणाले की, कंडोमचे उत्पादन आणि पॅकेजिंगचा खर्च वाढत असताना वाहतुकीलाही विलंब होत आहे. मोठ्या संख्येने कंडोम जहाजांवर चढवले जात आहेत, पण अद्याप गंतव्यस्थानी पोहोचलेले नाहीत. होर्मुझ सामुद्रधुनी ठप्प पडल्यामुळे कच्च्या तेलाच्या उत्पादन तसेच प्लास्टिक आणि इतर सामग्रीसह पेट्रोलियम उप-उत्पादनांवर परिणाम झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *