‘माझ्या बायकोला सासरी पाठवा,’ सासऱ्याने दिला नकार, संतापलेल्या जावयाने सासूरवाडीच पेटवली; आग दूरवर पसरली अन् अखेर…

नंदूरबारमध्ये संतापाच्या भरात जावयाने सासुरवाडीमधील घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला परत पाठवत नसल्याच्या रागातून एका जावयाने चक्क सासुरवाडीच पेटवून दिली. या आगीचा फटका शेजारी राहणाऱ्या एका घरालाही बसला आणि तेदेखील जळून खाक झाले. जावयाच्या कृत्यामुळे सासू-सासऱ्यांचा संसार आता उघड्यावर आला आहे. यानंतर जावई फरार झाला आहे. सासूने दिलेल्या तक्रारीच्या आधारे धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धडगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला परत पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने चक्क सासुरवाडीच पेटवून दिली आहे. केवळ सासुरवाडीच नाही, तर शेजाऱ्याचे घरही या आगीत जळून खाक झाले असून संतापलेल्या जावयाचे हे टोकाचे पाऊल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

धडगाव तालुक्यातील कुंडल मोहूपाडा येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. खडक्याचा पाटील पाडा येथील मिथुन पाडवी याचं लग्न कुंडल येथील मुलीशी झालं होतं, मात्र वादामुळे पत्नी माहेरी राहत होती. पत्नीला परत नेण्यासाठी आलेल्या मिथुनला सासऱ्यांनी नकार दिला, आणि याच रागातून जावई मिथुनने सासुरवाडीमधील घराला आग लावून दिली.

उन्हाळ्याचा तडाखा आणि वाऱ्यामुळे ही आग शेजारी राहणाऱ्या सुभाष वळवी यांच्या घरापर्यंतही पसरली. या भीषण आगीत दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात अन्नधान्य, कपडे आणि घराचे छप्पर जळून खाक झाले असून दोन्ही कुटुंबे आता उघड्यावर आली आहेत. या घटनेनंतर जावई फरार झाला आहे. सासूने दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *