पोलीस कर्मचाऱ्यांनीच उद्योजकाच्या घरातून चोरलं 21 तोळं सोनं;

रक्षकच भक्षक झाले असं म्हणता येण्यासारखा विचित्र प्रकार मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये घडला आहे. येथील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल 22 तोळे सोनं लुटल्याची घटना समोर आली आहे. एका उद्योजकाच्या घरी टाकलेल्या धाडीदरम्यान पोलीसच चोर झाल्याच्या प्रकराची राज्यभर चर्चा असून पोलीस खात्याच्या कारभारावर आता सर्वसामान्यांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय.

सीसीटीव्ही बंद केला अन्…

सोशल मीडियावर या उद्योजकाच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर दोषी पाचही पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हे पोलीस एका रुमच्या बाहेर उभे राहून दरवाजा कसा उघडता येईल याचा प्रयत्न करत असतानाचा या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. पुढे दरवाजा तोडून हे पोलीस रुममध्ये प्रवेश करुन सामान चोरुन घेऊन जात असल्याचं दिसतंय.

22 तोळे सोने चोरल्याचा आरोप

सदर उद्योजकाच्या घरी हे पोलीस कर्मचारी वॉरंट घेऊन गेले होते. निवृत्त एसीपीचा सहभाग असलेल्या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात येत होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याला त्रास दिल्याचा तसेच घरातील 22 तोळे सोने चोरल्याचा आरोप या उद्योजकाने केला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कारवाई

उद्योजक गौरव जैन यांनी या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगत तक्रार दाखल केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलीस कमिश्नर संतोष सिंह आणि डीसीपी कुमार प्रतिक यांच्याकडे 16 एप्रिल रोजी या उद्योजकाने तक्रार नोंदवल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मास्टर की वापरुन घराचं दार उघडलं

जैन यांनी केलेल्या आरोपांनुसार, 1 एप्रिल रोजी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी धाड टाकली. यामध्ये पोलीस निरीक्षक संजय वैष्णव, रणवीर कुशावह, प्रणीत भदौरिया, दिनेश गुज्जर आणि दिपेंद्र मिश्र या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश करण्यापूर्वी काही काळ आधी घराबाहेर रेकी केली. त्यानंतर त्यांनी सीटीटीव्ही कॅमेरा बंद केले. मास्टर की वापरुन त्यांनी घराचं दार उघडलं आणि घरात प्रवेश केला. या पोलीस धाडीदरम्यान घरातील 22 तोळं सोनं गायब झालं असल्याचं जैन यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

खासगी विश्रामगृहात ठेवलं अन्…

जैन यांनी पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतलं आणि लासुदीया पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. जैन यांना 1 आणि 2 एप्रिल रोजी पोलीस स्टेशनमध्येच डांबून ठेवण्यात आळं. पुढल्या दिवशी त्यांना खासगी कारमधून ग्वाल्हेरला नेण्यात आलं. त्यानंतर 3 एप्रिल रोजी जैन यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्याऐवजी खासगी विश्रामगृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. निवृत्त एसीपी राकेश गुप्तांशीसंबंधित काही पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे आपल्याला मारहाण केल्याची तक्रार जैन यांनी केली आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर जैन इंदूरला परतले. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांनी या प्रकरणावर व्यक्त होताना पोलिसांविरोधात कठोर कारवाई करुन या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पोलीस चोरी करत असल्याचा व्हिडीओही शेअर केलाय.

पोलिसांनी लाचही घेतली

जैन यांनी राकेश शर्मा नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याकडून 27 हजार रुपये घेतल्याचाही आरोप केला आहे. क्युआर कोडच्या माध्यमातून 10 हजार रुपये पोलीस स्टेशनजवळ असतानाच राकेश शर्माला पाठवल्याचं जैन यांनी सांगितलं. तर उरलेले 17 हजार रुपये या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाच्या खात्यावर पाठवल्याचं जैन यांचं म्हणणं आहे. जैन यांनी या प्रकरणामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी एसीपी पराग सानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तपासानंतर पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

…तर मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार

कारवाई करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी पोलीस निरीक्षक संजय वैष्णव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी कायदेशीर मार्गाने कारवाई केली. आम्हाला अडकवण्यासाठी उद्योजक खोटे दावे करत असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे. हॉटेल बांधण्यासंदर्भातील 65 लाखांच्या व्यवहारावरुन दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. जैन यांनी या प्रकरणामध्ये केवळ निलंबन करुन भागणार नाही तर या आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात कारवाई केली नाही तर मुख्यमंत्र्‍यांपर्यंत जाण्याचा इशारा जैन यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *