नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 18 एप्रिलला सर्व शाळांना सुट्टी जाहीर, नागरिकांनो काळजी घ्या

नागपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शनिवारी, १८ एप्रिल २०२६ रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’ची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

हवामान विभागाने १८ एप्रिलसाठी नागपूर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. काही भागांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. मार्च महिन्यापासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा ४३ अंशांच्या पुढे गेला आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा कडाका अधिक जाणवत असल्याने लहान मुले, वृद्ध तसेच कामगार वर्गाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेच्या तीव्रतेपासून दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवस हवामानाचा आढावा घेऊन गरज भासल्यास आणखी निर्णय घेतले जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, उष्णतेच्या वाढत्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात ‘हीट ॲक्शन प्लॅन’ लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात एकूण ५६ शीतकक्ष तयार करण्यात आले असून त्यापैकी दोन उपजिल्हा रुग्णालये आणि ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शीतकक्षांमध्ये एसी किंवा हाय-स्पीड कूलर्स, मुबलक बर्फ, तसेच गंभीर रुग्णांसाठी थंड पाण्याने स्पंजिंग किंवा बाथची सोय करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवला असून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शीघ्र कृती दलही तैनात करण्यात आले आहे. तसेच शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभागालाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये सकाळच्या सत्रात वर्ग घेणे, विद्यार्थ्यांना डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी थंड पेय देणे आणि दिवसातून किमान दोन वेळा ‘वॉटर बेल’ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागात ग्रामपंचायतींमार्फत दवंडी देऊन नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतीची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बस स्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा आदी ठिकाणी पाणपोई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूरकरांनी उष्णतेपासून बचावासाठी सतर्क राहावे, भरपूर पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे वापरावेत आणि लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *