पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज, बुधवारी वर्ष पूर्ण होत असताना, तेथील ह्रदयद्रावक थरार जीवावर बेतलेल्या कुटुंबीयांच्या मनातील वेदना आजही ओसरलेल्या नाहीत. ‘गेल्या वर्षभरात आम्ही दोघी एकही रात्र सलग आठ तास झोपू शकलो नाही. कानात किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज गुंजतात. दहशतवादी आल्याची स्वप्ने रोज पडतात, अशा शब्दांत आसावरी आणि प्रगती जगदाळे यांनी भावना व्यक्त केल्या.
जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीयांच्या मनावरील जखमा अजूनही ओल्या आहेत. मात्र दु:खातून सावरून आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला आहे. भय जागे असले, तरी धैर्याने ते सामोरे जात आहेत.दरम्यान, गेल्या महिनाभरापासून पुण्यातील पर्यटकांचे पुन्हा एकदा चौकशीचे फोन सुरू झाले असल्याची माहिती पर्यटन कंपन्यांनी दिली.
आठवणींची साक्ष देणारे क्षण…
कौस्तुभ गनबोटे नेहमीच मुलाला जबाबदारीची जाणीव करून देत असत. ‘मी अचानक गेलो तर’ असा प्रश्न ते हलक्या फुलक्या शब्दांत विचारायचे; पण त्या वाक्यामागे दडलेली जाणीव आज खरी ठरल्याचे कुटुंबीय सांगतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीचा एक प्रसंग कुटुंबासाठी खास ठरला आहे. कौस्तुभ यांना आंब्यांची विशेष आवड होती. त्या दिवशी कुणाल आंबे आणण्यासाठी गेला. मात्र, वडिल आणायचे, त्यांना आवडायचे असे आंबे त्याला मिळाले नाहीत. घरी येऊन त्याने आईला विचारले, ‘बाबा माझी परीक्षा घेत आहेत का?’ हा साधा प्रसंग कुटुंबासाठी भावनिक आठवण बनून राहिला आहे.
बेखौफ होकर आए…
पुणे : ‘आजही त्या घटनेचा परिणाम जाणवतो. आम्हा स्थानिकांना या घटनेने काय यातना दिल्या, ते शब्दांत सांगणे कठीण आहे,’ अशी भावना जम्मू-काश्मीरमधील स्थानिकांनी व्यक्त केली. पहलगाम या गावी लोक येतात; पण मुक्कामी थांबत नसल्यामुळे इथल्या पर्यटनावर, बाजारपेठेवर त्याचा नकारात्मक परिणाम कायम आहे. मात्र, कडेकोट सुरक्षा असल्याने बिनधास्त यावे, असे आम्ही सांगू शकतो, असे अरमान मीर आणि कंवर टिकू यांनी सांगितले
