मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करत असाल तर जरा थांबा. कारण उद्या आणि परवा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 3 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत पुलाच्या कामासाठी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. 23 एप्रिलला मुंबईकडे जाणारी तर 24 एप्रिलला पुण्याकडे जाणारी वाहतूक 3 तासांसाठी बंद राहील. या कालावधीत वाहने जुन्या महामार्गावरून वळवली जातील. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वेळेचं नियोजन करूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुलावर दुरुस्ती व रंगकामाची कामे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. डोंगरगाव/कुसगाव (कि.मी. 58/500) येथील पुलावर दुरुस्ती व रंगकामाची कामे केली जाणार असल्यानं दोन दिवस काही वेळासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल 2026 रोजी म्हणजे गुरुवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या वेळेत सर्व वाहने किवळे, देहूरोड आणि तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरून कुसगाव टोल प्लाझामार्गे मुंबईकडे वळवण्यात येणार आहेत.
पर्यायी मार्ग कसा असेल?
तसेच 24 एप्रिल 2026 रोजी म्हणजे शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. या काळात वाहनs कुसगाव टोल प्लाझामार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहूरोड व किवळे मार्गे पुण्याकडे वळवली जातील. या ब्लॉकमुळे त्या वेळेत प्रवास करणाऱ्यांना थोडा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी आपला प्रवास आधीच नियोजित करावा आणि शक्य असल्यास दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान काही अडचण आली तर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग नियंत्रण कक्ष (9822498224) किंवा महामार्ग पोलीस (9833498334) यांच्याशी संपर्क साधता येईल. हा ट्रॅफिक ब्लॉक आवश्यक देखभाल कामांसाठी घेण्यात आला असून भविष्यात रस्त्यावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी ही कामे महत्त्वाची असल्याचे MSRDC कडून सांगण्यात आले आहे.
