ती महिला वाटेल तसं बोलली, शिव्या दिल्या; वरळीत आंदोलनावेळी नेमकं काय घडलं? गिरीश महाजनांनी सांगितलं

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विरोधी पक्षांच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन केली जात आहेत. मुंबईतील वरळी येथेही काल भाजपकडून आंदोलन करण्यात आलं होतं. परंतु या आंदोलनावेळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे एका संतप्त महिलेने भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची खरडपट्टी काढली. महाजन यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनाही सुनावत सदर महिलेने आपला संताप व्यक्त केला. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता गिरीश महाजन यांनी संपूर्ण घटनेवर आपली भूमिका मांडली आहे.

मुंबईत आंदोलनावेळी झालेल्या घटनेविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, “आंदोलन सुरू असताना झालेल्या वाहतूक कोंडीमुळे काही महिला वैतागल्या होत्या. आंदोलनामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी आणि सर्वसामान्यांची गैरसोय होत असते. पण यावेळी एक महिला भगिनी वाटेल त्या भाषेत बोलत होती. महिला पोलिसांविषयीही सदर महिला वाईट भाषेत बोलली. आम्ही १०-१५ मिनिटांत जाऊ, असं मी त्या महिलेला समजावत होतो. पण त्या महिलेने गर्दीत बाटली फेकून मारली, चुकीच्या भाषेचा वापर केला,” असं महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, असे प्रकार टाळण्यासाठी काळजी घेणार असल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. “पुढच्या वेळी मोर्चामुळे कोणाची गैरसोय होणार नाही, यासाठी आम्ही काळजी घेऊ,” असं महाजन यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले

वरळीतील मोर्चानंतर आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ‘काँग्रेस आणि त्यांच्या चट्ट्याबट्ट्यांनी कायमच महिला आरक्षणाला आणि त्यांच्या सक्षमीकरणाला विरोध केला. आजचा मोर्चा पाहून त्या विरोधकांची झोप उडाल्याशिवाय रहाणार नाही. हा पहिला मोर्चा ही केवळ सुरुवात आहे. जोपर्यंत विरोधकांच्या नाकावर टिच्चून लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के महिला आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत दिला.

‘महिलांना सक्षम करण्याचा काँग्रेसचा कधीच हेतू नव्हता. इतिहासात तसे प्रयत्न झाले तेंव्हा काँग्रेसने विरोधाचीच भूमिका घेतली. २०२३मध्ये भाजपच्या नेतृत्वातील सरकारकडे दोन-तृतीयांश बहुमत होते. विरोध करून फायदा नसल्याने काँग्रेसने तेव्हा मन मारून विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र, आता भाजपकडे साधे बहुमत आहे, दोन-तृतीयांशचे संख्याबळ नाही. हे माहीत असल्यानेच काँग्रेस व मित्रपक्षांनी आरक्षण लागू करण्यासाठीच्या घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध केला’, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *