तुला डिजिटल अरेस्ट करतोय, पिंपरीतील तरुण फसला, 12 लाख द्यायला निघाला, 80 वर्षीय वडिलांची जागरुकता, भामट्यांचा डाव उधळला

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाला ‘ डिजिटल अरेस्ट ’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी फसवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत उघड झाला आणि तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक टळली.

भामट्यांचा तरुणाला फोन

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाला व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे अज्ञात इसमाने संपर्क साधला. समोरील व्यक्तीने स्वतःला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचमधील अधिकारी असल्याचे भासवले. त्याने तरुणाच्या नावावर एक पार्सल पकडण्यात आल्याचे सांगत, त्या पार्सलमध्ये पाच पासपोर्ट आणि एमडी अंमली पदार्थ आढळल्याचा दावा केला.

व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी

“तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागेल,” असे सांगून तरुणाला भीती दाखवण्यात आली. पुढे ‘सिग्नल’ अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी सुरु करण्यात आली. कॉलदरम्यान पोलिस वर्दीत असल्याचे भासवणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगत, कोणालाही माहिती देऊ नये अशी धमकी दिली.

२७ तासांची चौकशी

सुमारे २७ तास चाललेल्या या प्रकारात आरोपींनी तरुणाकडून त्याचे बँक खाते आणि आधार कार्डची माहिती मिळवली. तसेच ‘क्लिअरन्स सर्टिफिकेट’ देण्यासाठी बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. या भीतीपोटी संबंधित तरुणाने आपल्या म्युच्युअल फंडमधून १२ लाख रुपये काढण्याची तयारी केली होती.

सावध वडिलांचा पोलिसांना फोन

दरम्यान, तरुणाने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. त्यांच्या वडिलांनी तत्काळ सावधगिरी बाळगत निगडी पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार सोपन बोधवड यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. सोपन बोधवड, मुकुंद वारे आणि महिला पोलिस अंमलदार स्नेहा मस्के यांनी पीडिताच्या घरी जाऊन त्याला आणि त्याच्या पत्नीला योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे हा ‘डिजिटल अरेस्ट’चा प्रकार उघडकीस आला आणि मोठी आर्थि

जनजागृती मोहिमेचा फायदा

पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेमुळे संबंधित ज्येष्ठ नागरिकांना या प्रकाराची जाणीव झाली आणि त्यांनी वेळीच पोलिसांशी संपर्क साधला, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांसाठी आवाहन

‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. कोणताही पोलिस अधिकारी व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाही. अशा प्रकारचे कॉल किंवा संदेश आल्यास घाबरून न जाता तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच आपल्यासोबत सायबर फसवणूक झाल्यास १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *