भावाच्या लग्नाला जाताना काळाची झडप, बाईक चालवताना झोपेची डुलकी; भीषण अपघातात युवकाचा करुण अंत

दुचाकी चालवताना किंवा चारचाकी चालवताना आपल्याला झोप आल्यास गाडी योग्य ठिकाणी थांबवून विश्रांती घेणं अत्यावश्यक आहे, अन्यथा एक डुलकीही जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पालघर कुंबळे राज्य मार्गावर झालेल्या भीषण अपघातात घडली आहे. 35 वर्षीय युवकाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली. कल्पेश प्रकाश आदावडे (वय 35, मूळ रा. मानेवाडी चिखलगाव, ता. दापोली) असं मृत्यू झालेला युवकाचे नाव आहे. कल्पेश आपल्या भावाच्या लग्नासाठी दुचाकीवरून गावी येत होते.

नेमका कसा झाला अपघात?

पालघर-कुंबळे राज्यमार्गावर चिंचाळी फाट्याजवळ 19 एप्रिल रविवारी रोजी सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कल्पेश प्रकाश आदावडे (वय 35, मूळ रा. मानेवाडी चिखलगाव, ता. दापोली) असं मृत व्यक्तीचं नाव असून, त्यांच्यासोबत मागे बसलेले विलास पांडुरंग मोहिते (वय 48) हे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश आदावडे हे आपल्या भावाच्या आज मंगळवारी होणाऱ्या लग्नासाठी 18 एप्रिलला म्हणजे शनिवारी मध्यरात्री सुमारास विरार येथून स्वतःच्या दुचाकीने गावी निघाले होते. प्रवासादरम्यान इंदापूर येथे त्यांनी सुमारे एक तास विश्रांती घेतली होती. मात्र, त्यानंतरच्या प्रवासात त्यांना वारंवार झोपेची डुलकी येत होती. काहीवेळ त्यांनी थांबून चेहऱ्यावर पाणी मारुन त्यांनी थकवा दूर करण्याचा प्रयत्न केला, पण थकवा पूर्णपणे दूर झाला नाही.

गाडी चालवताना डुलकी

मंडणगड तालुक्यातील चिंचाळी धरणाच्या पुढे, कुंभवे गावाच्या आधी, पुन्हा डुलकी लागल्याने त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन खड्ड्यात कोसळली. या अपघातात कल्पेश आदावडे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमी विलास मोहिते यांना बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

याप्रकरणी विलास मोहिते यांनी मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, झोपेची डुलकी येत असतानाही दुचाकी चालविणे, तसेच रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, घरात लग्नाचा आनंदाचा उत्सव असताना अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे आदावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त होत असून, या घटनेने परिसरात शोककाळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *