महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने कमबॅक केल्याचं बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने नागरिक त्रस्त झाले होते. काही ठिकाणी उष्माघाताने मृत्यू देखील झाल्याची माहिती समोर आली. संपूर्ण जगात सर्वाधिक तापमान नोंदवलेली अनेक शहरं ही महाराष्ट्रातील होती. विदर्भातही प्रचंड ऊन पडलं होतं. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. कडाक्याच्या उन्हानंतर राज्यात हवामानात पुन्हा बदल झाला आहे. सांगली जिल्ह्यात पाऊस पडतोय. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून सांगली जिल्ह्याला तीन तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील 4 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून संध्याकाळी सात वाजता माहिती जारी करण्यात आली. सांगली जिल्ह्याला पुढच्या तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. यावेळी ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचीही दाट शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या चार जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि मध्यम ते मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता आहे. यासोबत काही ठिकाणी गारपीट होण्याचीजदेखील शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
20 एप्रिलला काय परिस्थिती राहणार?
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा 20 जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, तसेच हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा ताशी 30-40 किमी असा असण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाटात पाऊस होणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यात 22 ते 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.
