अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे जबाब नोंदवले
आज सलग तिसऱ्या दिवशीही महिला आयोगाकडून ही चौकशी सुरू आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे जबाब नोंदवले जात आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या या पथकाने पीडितांची आपबिती जाणून घेतली आहे. आता या चौकशीचा सविस्तर अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर केला जाणार आहे.
धक्कादायक बाबी समोर
दोन दिवस सलग दीड-दीड तास चाललेल्या या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विशेषतः कंपनीतील अंतर्गत सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आज तिसऱ्या दिवशीच्या चौकशीनंतर या प्रकरणात कोणकोणते ‘मोठे मासे’ गळाला लागतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
वडिलांसाठी ‘कॉर्पोरेट छळ’ सहन केला
नाशिकच्या आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणामध्ये प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कंपनीत महिलांवरील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर आरोप झाले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाचे चार सदस्यीय पथक गेल्या दोन दिवसांपासून कंपनीत ठाण मांडून बसले आहे. त्यांच्या तपासात समोर आलेली माहिती कोणत्याही संवेदनशील माणसाला सुन्न करणारी आहे. एका पीडित तरुणीने आपला छळ का सोसला? यामागचं कारण हृदयद्रावक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या तरुणीचे वडील कॅन्सरने ग्रस्त आहेत. त्यांच्या पगारातून आणि कंपनीच्या मेडिकल विम्यातून होणाऱ्या केमोथेरपीसाठी, औषधांसाठी आणि पैशांसाठी ही तरुणी हा मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली. आपल्या पित्याचा जीव वाचवण्यासाठी तिने हा ‘कॉर्पोरेट छळ’ निमूटपणे सहन केला.
नोकरीच्या नावाखाली गरिबीची थट्टा
दुसरीकडे, एका दुसऱ्या पीडितेची कहाणीही तितकीच भीषण आहे. घरात अन्नाचा कण नव्हता, अर्धांग वायूने वडील अंथरुणाला खिळलेले होते. कुटुंबाची भूक भागवण्यासाठी नोकरीची गरज होती आणि याच हतबलतेचा गैरफायदा घेत तिला धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याकडे ओढण्यात आले. नोकरीच्या नावाखाली गरिबीची थट्टा करत हा धर्मांतराचा खेळ सुरू होता.
गुन्हे दाखल: लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या आरोपावरून कारवाई करताना 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महिला आयोगाचा कडा पहारा: सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे.
सीसीटीव्ही तपासणी: तांत्रिक पुरावे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
बैठक व्यवस्थेवर प्रश्न: महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या सेटिंग अरेंजमेंटची चौकशी करण्यात आली.
पॉश समिती: कंपनीत अंतर्गत तक्रार समिती कागदावरच आहे का? याची तपासणी केली गेली.
कॉर्पोरेट जगतात महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हतबलतेचा फायदा घेऊन धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध आता महिला आयोग काय कठोर पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
