देशी गोवंशाचे संरक्षण आणि त्यांच्या आनुवंशिक सुधारणेच्या प्रयत्नात राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने एक मोठे यश संपादन केले आहे. अहिल्यानगर येथील पांजरापोळ गोरक्षण संस्थेत राबविण्यात आलेल्या पहिल्याच भ्रूण प्रत्यारोपण चाचणीचे निकाल गुणवत्तापूर्ण लागले असून यामध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आलेल्या गायींमधील ६३ टक्के गायींमध्ये गर्भधारणा झाली आहे.
नैसर्गिकरित्या गाय वर्षाला एका वासराला जन्म देते. परंतु, भ्रूण प्रत्यारोपण एकाच उच्च वंशावळीच्या गायीपासून वर्षाकाठी ४० ते ५० वासरे मिळवणे शक्य आहे. वयात आलेल्या कालवडी, वयस्कर गायी किंवा तात्पुरते वंध्यत्व असलेल्या जनावरांकडूनही स्त्रीबीज संकलित करून त्यांपासून भ्रूण तयार करता येतात.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भ्रूण प्रत्यारोप व आयव्हीएफ प्रयोगशाळा, ताथवडे (पुणे) यांनी राबवला. २५ डिसेंबर २०२५ रोजी १९ गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाची प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानतंर २५ मार्च २०२६ रोजी करण्यात आलेल्या तपासणीत १२ म्हणजेच, ६३ टक्के गायी गाभण असल्याचे स्पष्ट झाले. देशी गायींच्या संवर्धनासाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रत्यारोपण करण्यात सहभाग असलेल्या पथकातील डॉ. विष्णू जवणे आणि डॉ. नवटाके यांनी व्यक्त केला.
दाता गायी किंवा म्हशींची निवड करताना त्यांची शुद्ध वंशावळ, रोग प्रतिकारकशक्ती, दुधातील स्निग्धांश, दूध देण्याचा कालावधी, एकूण दूध उत्पादन क्षमता आणि स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता इ. गुणधर्मांचा प्रामुख्याने विचार केला जातो. याउलट, दायी माता म्हणून कोणत्याही जातीच्या किंवा गावठी जनावरांचा वापर करता येतो. यामुळे गोठ्यातील कमी दूध देणाऱ्या जनावरांपासूनही उच्च आनुवंशिक गुणधर्म असलेली वासरे मिळवणे व भविष्यात प्रती जनावर दूध उत्पादन वाढवणे शक्य होणार आहे.
