भारतामध्ये 1990 च्या दशकात जपानच्या शार्प टीव्हीचा एक वेगळा दबदबा होता. जपानी गुणवत्तेच्या चांगल्या पिक्चर क्वालिटीमुळे शार्प टीव्हीला भरपूर मागणी होती. पण नंतरच्या स्पर्धेच्या काळात ही कंपनी मागे पडली. जपानची ही शार्प इंडिया कंपनी आता मराठी माणसाने ताब्यात घेतलीय. विशेष म्हणजे हा मराठमोळा माणूस पक्का पुणेकर आहे. त्याने खरेदी केलेल्या या कंपनीच्या शेअर्सचा करार शुक्रवारी जपानमध्ये पूर्ण करण्यात आला. या माध्यमातून जपानच्या उद्योग क्षेत्रावर मराठमोळ्या माणसाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्याचं पाहायला मिळत आहे.
ही मराठी व्यक्ती कोण?
ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय त्या व्यक्तीचं नाव आहे चंद्रकांत गायकवाड! मुळचे पुण्याचे असलेले चंद्रकांत गायकवाड यांची स्मार्ट सर्व्हिसेस नावाच्या कंपनीने काल जपानमध्ये एक काळ गाजवणाऱ्या शार्प कंपनीसोबत शेअर ॲग्रीमेंट करार केला. या कराराअंतर्गत गायकवाड यांनी कंपनीचे 75 टक्के शेअर्स विकत घेतले आहेत. त्यामुळेच आता या पुण्यामध्ये असलेल्या या जपानी कंपनीवर मराठी माणसाची मालकी असणार आहे. हा संपूर्ण सौदा 19.46 कोटी रुपयांना झाल्याची माहिती समोर आली आहे.
कर्मचारी किती आहेत?
सध्या शार्प इंडिया कंपनीत 80 कर्मचारी काम करत असून या कर्मचाऱ्यांची जबाबदारीही स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने घेतली आहे. स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी ही हाऊस किपिंग, मॅन पॅावर सप्लायसह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल दीड हजार कोटी रुपयांची आहे. गायकवाड यांच्या माध्यमातून आता कंपनीला नवा मालक लाभल्याने कंपनी पुन्हा जोमाने उभारी घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेअर बाजारात शेअर्सच्या किंमतीत उसळी
कंपनीने 145 कोटींच्या कर्जाचे असाइनमेंटही केले असून आता या कंपनीला गायकवाड कसे निराशेच्या गर्तेतून वर काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कंपनीची मालकी बदलल्याची बातमी समोर आल्यानंतर कंपनीची शेअर प्राइज 20 टक्क्यांनी वर गेली आणि अपर सर्किट लावण्यात आला. शुक्रवारी समार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Smart Services Private Limited) कंपनीचा एक शेअर 60 रुपयांपर्यंत पोहोचला. ही एक सकारात्मक सुरुवात मानली जात आहे.
कंपनीची सुरुवात कधी झाली? ते कोणत्या गोष्टी बनवायचे?
खरं तर जपानमधील कंपनीची मालकी असलेल्या या कंपनीची मूळ स्थापना 1985 मध्ये कल्याणी ग्रुपद्वारे करण्यात आलेली. वर्षभरामध्येच शार्प जपान कंपनीसोबत भागीदारीचा करार झाल्यानंतर कंपनीचं नाव ‘शार्प इंडिया कंपनी’ असं करण्यात आलं. सध्या ही कंपनी पूर्णपणे जपानी कंपनीच्या मालकीची होती. सुरुवातीला ही कंपनी सुरुवातीला कलर टीव्ही, ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही, व्हीसीआर या सारख्या त्या काळातील आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील गोष्टी बनवायची. नंतर कंपनीने हळूहळू आपलं लक्ष एलईडी आणि एसीवर केंद्रीत केलं. पुणे जिल्ह्यामधील शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे या कंपनीचा कारखाना असून मुख्य कार्यालयही पुण्यातच आहे.
