देशातील कोणत्याही भागात कार चालवा बिनदिक्कत, BH नंबरप्लेटला पुण्यात उदंड प्रतिसाद, रचना अत्यंत वेगळी

‘वन नेशन वन नंबर’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या भारत क्रमांक (बीएच) सीरीजला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) २०२५-२६ या आर्थिक वर्षात सात हजार ३९४ वाहनांची ‘बीएच सीरीज’अंतर्गत नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येते.

बीएच सीरीजची खासियत

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहनांची नोंदणी हस्तांतरित (व्हेइकल रजिस्ट्रेशन ट्रान्सफर) करण्याचे टाळण्यासाठी सन २०२१ मध्ये रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने ‘बीएच सीरीज’ सुरू केली होती. एखादे वाहन दुसऱ्या राज्यात फक्त १२ महिने चालवता येऊ शकते. त्यानंतर वाहन त्याच राज्यात चालवायचे झाल्यास त्या राज्यात ते वाहन नोंदणी करणे आवश्यक असते.

‘बीएच सीरीज’ला वाढता प्रतिसाद

‘मोटर वाहन अधिनियम, १९८८, कलम ४७’अंतर्गत वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक असते; परंतु वाहन मालकाकडे ‘बीएच नंबर सीरीज’ असेल, तर त्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कोणत्याही परवानगी घ्यायची गरज लागत नाही. तो या सीरीजवर देशातील कोणत्याही राज्यात किंवा राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बिनदिक्कतपणे प्रवास करू शकतो. त्यामुळे ‘बीएच सीरीज’ला प्रतिसाद वाढत आहे.

गेल्या आर्थिक वर्षात ७३९४ नोंदण्या

पुण्यात अनेक केंद्रीय सरकारी, निमसरकारी कार्यालय आहेत; तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे ‘बीएच सीरीज’ घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात सात हजार ३९४ जणांनी ‘बीएच सीरीज’ घेतली आहे. यामध्ये चार हजार ६३७ जणांनी कारसाठी ‘बीएच सीरीज’ घेतली आहे, तर दुचाकीसाठी २, ७५७ जणांनी सीरीज घेतली आहे.

नंबर प्लेटची रचना

‘बीएच सीरीज’च्या वाहनांच्या नंबरप्लेट या वर्षानुसार ओळखल्या जातात. ज्या वर्षी ‘बीएच सीरीज’चा क्रमांक घेतला आहे. त्यानुसार वर्षाचे शेवटे दोन क्रमांक, ‘बीएच’ आणि नंतर वाहनाचा क्रमांक व शेवटी ‘ए’ ते ‘झेड’ दरम्यानचे एक अक्षर असेल. सुलभ प्रक्रिया आणि देशभर निर्बंधमुक्त वाहन वापराची सुविधा यामुळे पुण्यात ‘बीएच सीरीज’ची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *