असह्य उकाड्यावर पावसाची फुंकर! हवामान बदलांनी डोकं चक्रावेल, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; उन्हाचा की पावसाचा?

हाराष्ट्रासह देशभरात तापमानात वाढ होत असल्यामुळं उकाड्यानं आपले पाय रोवले असंच वाटत असताना पुन्हा एकदा वाऱ्यांची दिशा बदलली. एकिकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीशीपार गेलेलं असताना आणि सरासरी तापमानात 4 अंशांहून अधिक वाढ झाल्यानं उष्णतेची लाट सक्रिय असतानाच आता पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होताना दिसत आहे. परिणामी उकाडा असह्य होत असतानाच आता पूर्वमोसमी पावसाची फुंकर नागरिकांना दिसाला देताना दिसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

पुढच्या 24 तासांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहील ज्यामुळं या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाची शक्यता असल्यामुळं इथं आकाश अंशत: ढगाळ असेल. तर सायंकाळनंतर या भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता आहे. पावसाच्या अंदाजामुळं पुढील 24 तासांसाठी सोलापूर आणि धाराशिवमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तीन दिवस पावसाचे 

18 ते 20 एप्रिलदरम्यान राज्यात पुण्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल. सध्या वातावरणाच्या खालच्या थरात समुद्र सपाटीपासून साधारण दीड किलोमीटर अंतरापर्यंत मध्य प्रदेशच्या इशान्येस चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत आहे. हे वारे मराठवाडा, विदर्भामार्गे जात आहेत. तर, कर्नाटक आणि महाराष्ट्रालगत वाऱ्याची चक्राकार स्थिती स्थिरावली असल्यामुळं पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होताना दिसत आहे. या धर्तीवर 19 एप्रिल रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडसह 20 एप्रिलला अहिल्यानगर, पुणे, सातारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, नांदेड यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईकरांना किमान दिलासा…

उत्तर भारतात सक्रिय असणाऱ्या उच्च दाब क्षेत्रामुळे मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली. रविवारपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ही स्थिती कायम राहील. नव्या आठवड्यात मात्र हे चित्र बदलण्यास सुरुवात होईल आणि नागरिकांना उकाड्यापासून किमान दिलासा मिळेल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *