उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ लागू केली असून, त्यासोबतच प्रत्येक तिकिटावर दोन रुपयांचा स्वच्छता अधिभारही आकारला जाणार आहे. ही भाडेवाढ बुधवारपासून लागू झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीच एसटी महामंडळाने भाडेवाढ केल्यानंतर हंगामी भाडेवाढ करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारांतून राज्याच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस धावतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे, पर्यटनासाठी निघणारे; तसेच देवदर्शनासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ लागू केली आहे. १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत ही भाडेवाढ लागू राहणार आहे.
एसटीने काही महिन्यांपूर्वीच दरवाढ केली होती. आता हंगामी दरवाढ केल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही वाढ अधिक जाणवणार असून, कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांचे बजेट विस्कळित होण्याची शक्यता आहे. एसटी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वाढती इंधन किंमत, देखभाल खर्च आणि अतिरिक्त प्रवासी व्यवस्थापन यामुळे ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
उन्हाळी सुट्टीत वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे एसटी महामंडळाला या भाडेवाढीचा आर्थिक फायदा होणार आहे. गेल्या वर्षी दिवाळीत भाडेवाढ न केल्याने झालेल्या महसुली तुटीची काही प्रमाणात भरपाई करण्याचाही हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. एकूणच, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय महामंडळासाठी फायदेशीर ठरणार असला तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी मात्र आर्थिक फटका देणारा ठरत आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाकडून सुट्टीच्या काळात हंगामी भाडेवाढ केली जाते. भाडेवाढीबरोबरच एसटीने प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी बसची स्वच्छता, वेळेचे पालन आणि आरामदायी प्रवास या बाबतीत तक्रारी कायम आहेत. त्यामुळे भाडेवाढ झाली; पण सुविधा कुठे आहेत, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
