बीड बायपासवरील गांधेली फाटा परिसरात बुधवारी १५ एप्रिल रोजी रात्री रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या मिथुन भास्कर या वकिलाच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे. ही आत्महत्या किंवा अपघात नसून पैशांच्या वादातून हत्या झाली असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी एका तृतीयपंथीयासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. सादीक बशीर अन्सारी (वय ४०), नानासिंग जुली (वय २०) आणि एका अल्पवयीन मुलाचा यात समावेश आहे.
नेमकी घटना काय?
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत वकील मिथुन भास्कर हे बुधवारी १५ एप्रिल रोजी सायंकाळी गांधेली फाटा परिसरात सादीक नावाच्या तृतीयपंथीयाला भेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वाद वाढत गेल्यानं संतापलेल्या सादीकने आपल्या साडीत लपवून ठेवलेला चाकू काढला आणि थेट भास्कर यांच्या मांडीवर वार केला.
झुडपातील टाळी अन् थरार
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या टोळीची कार्यपद्धती गांधेली फाटा परिसरात रात्रीच्या वेळी ही टोळी सक्रिय असते. सावज जाळ्यात अडकलं की, झुडपातून टाळी वाजवून साथीदारांना सिग्नल दिला जातो. भास्कर यांच्याशी वाद सुरू असतानाच सादीकने टाळी वाजवली आणि त्याचे दोन साथीदार मदतीला आले. जखमी भास्कर यांनी ओरडू नये म्हणून या तिघांनी त्यांना तिथेच दाबून धरले. मांडीतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने भास्कर बेशुद्ध पडले. ते मृत झाल्याचं समजताच आरोपींनी त्यांना रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला. हत्या केल्यानंतर घाबरलेला सादीक शिवाजीनगर भागात आपल्या गुरूकडे जाऊन लपला होता. मात्र, पोलिसांनी रात्रीच बायपासवरील तृतीयपंथीयांचे नेटवर्क खंगाळले आणि सादीकचा माग काढला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर दोन साथीदारांची नावंही सांगितली. सहाय्यक निरीक्षक भारत पाचोळे आणि त्यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना जेरबंद केलं आहे.
‘बीड बायपासवर रात्रीस खेळ चाले’
झाल्टा फाटा ते गांधेली फाटा या मार्गावर तृतीयपंथीयांची मोठी टोळी सक्रिय आहे. बाहेरून येणारे ट्रक चालक किंवा बाजारपेठेतून परतणाऱ्या व्यापाऱ्यांना हे लोक टार्गेट करतात. झुडपात नेऊन लुटणं आणि विरोध केल्यास हल्ला करणं असा यांचा शिरस्ता आहे. अब्रू जाण्याच्या भीतीनं अनेक जण तक्रार करत नाहीत, याच गोष्टीचा फायदा घेत या टोळीची हिंमत वाढल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
