उन्हाच्या तडाख्यामुळे त्रस्त झालेल्या रेल्वे प्रवाशांचा हार्बरवरील प्रवास आता अधिक गारेगार होणार आहे. ताफ्यात दाखल झालेली नवी वातानुकूलित (एसी) लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल वाशी मार्गावर चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे हार्बरवरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होणार आहे. मध्य रेल्वेवरील उपनगरी एसी फेऱ्यांची संख्या १००पार होणार आहे.
आणखी १४ फेऱ्यांची भर
उन्हाळ्यात एसी लोकलमधून प्रवास करण्याकडे प्रवाशांचा कल आहे. मात्र, यामध्ये गर्दी वाढत असल्याने प्रवाशांकडून फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने जोर धरत आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मार्गासह सीएसएमटी ते पनवेल-वाशीदरम्यान एकूण १.०६ लाख प्रवासी रोज प्रवास करत आहेत. सध्या हार्बर मार्गावर १४ फेऱ्या धावत आहेत. नव्या लोकल गाडीमुळे यात आणखी १४ फेऱ्यांची भर पडेल. लवकरच नव्या वातानुकूलित फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. हार्बरवरील एसी लोकलची रोज सरासरी चार हजार ४७१ तिकिटांची विक्री होत आहे. तिकीट आणि पासच्या माध्यमातून रोज सरासरी ४० हजार १७ प्रवासी गारेगार प्रवासाचा अनुभव घेत आहेत.
पश्चिम रेल्वेवर एसीच्या १२४ फेऱ्या
मध्य रेल्वेच्या ताफ्यात सात उपनगरी एसी गाड्यांच्या मदतीने ९४ फेऱ्या पूर्ण केल्या जातात. हार्बरवरील १४ फेऱ्यांनंतर एकूण फेऱ्यांची संख्या १०८वर पोहोचणार आहे. पश्चिम रेल्वेवर एसीच्या १२४ फेऱ्या आहेत. त्यातून सरासरी १.७५ लाख प्रवासी प्रवास करतात.
‘एसी आणा, पण वक्तशीरपणाही राखा’
‘जानेवारीमध्ये १४ एसी फेऱ्या सुरू झाल्या. मात्र, त्यामुळे या लोकलच्या पुढे-मागे धावणाऱ्या साध्या लोकलच्या वक्तशीरपणावर परिणाम झाला आहे. एसी लोकलचे दरवाजे उघड-बंद होण्याच्या प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे गाड्या विलंबाने धावतात. यामुळे रेल्वे प्रशासनाने एसी फेऱ्या वाढवण्यासह साध्या लोकलचा वक्तशीरपणा राखावा’, अशी प्रतिक्रिया हार्बरवरील प्रवाशांनी व्यक्त केली.
मुंबई-ठाणे प्रवास सुलभ होणार
वडाळा-कासारवडवली मेट्रोचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. गेल्या 6 वर्षांपासून या मार्गिकेचं काम रखडलं असून आता या मेट्रो मार्गावरील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो लाइन 4च्या मार्गावर केवळ एका स्थानकाचं काम शिल्लक होतं. त्यासाठी अखेर एमएमआरडीने जमीन संपादित केली असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे.
