साताऱ्याच्या कराड पोलिसांनी एका सराईत चोरट्याला जेरबंद केलं आहे. हा जोरचा अतिशय चालाखीने शहरी भागात फिरायचा. तो कुणाच्याही लक्षात येणार नाही, असा वावरायचा. त्यासाठी तो थेट कारमधून फिरायचा. तसेच कारमधून उतरल्यानंतर कुणाच्या तरी घरी आपल्याला जायचं आहे, असं भासवायचा. पण तो मुळात कुणाच्या घरी जायचाच नाही. या निमित्ताने तो परिसरातील बंद घर कुठली आहेत. त्या घरांची तो रेकी करायचा. यानंतर तो संधी साधून घरफोडी करुन चोरी करायचा. पण या अट्टल चोराला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.
बंद घरांची रेकी करत स्वतःच्या कारमधून येऊन घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेड्या ठोकल्या. लोकेश रावसाहेब सुतार (रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली), असे अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याने सातारा, सांगली, कोल्हापुरसह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात घरफोड्या केल्याची कबुली संशयिताने दिली आहे. दरम्यान, कराड पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे शहरातील नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलकापूर आणि सैदापूर परिसरात एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच घरफोड्या झाल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मलकापूर तसेच सैदापूर परिसरात शैक्षणिक संकुले असल्याने मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग वास्तव्यास आहे. सुट्टीच्या काळात बंद घरे, फ्लॅट चोरट्यांच्या टार्गेटवर असतात. ही बाब लक्षात घेऊन कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक निखील मगदूम यांना घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून संशयितांना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना एका कारचा सुगावा लागला. ती कार लोकेश रावसाहेब सुतार याच्या नावावर होती. अधिक तपासात तोच सराईत चोरटा असल्याचे निष्पण्ण झाले. त्याला अटक केल्यानंतर मलकापूर आणि सैदापूरमधील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.
संशयिताने चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार, असा मिळून 15 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच त्याच्यावर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यामध्ये चोरी, घरफोडीचे 20 गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे. कराड शहर पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, डीबी पथकाचे उपनिरीक्षक निखील मगदूम, अंमलदार सतीश पाटील, संदीप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, नीलेश विभुते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.
