टीसीएसकंपनीत अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल तिसऱ्या गुन्ह्यात संशयित शफी शेख आणि रझा मेमन यांना गुरुवारी (दि. १६) जिल्हा व सत्र न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांच्या न्यायालयाने सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला.
गुन्हा करण्याची पद्धत एकसारखी
सरकारी पक्षातर्फे सहाय्यक संचालक किरण बेंडभर आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिकेत आव्हाड यांनी युक्तिवाद केला. संशयितांच्या बाजूने वकील राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडली. संशयितांची गुन्हा करण्याची पद्धत एकसारखी असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत. गुन्हे वेगवेगळ्या कालावधीत घडले आहेत. या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती मोठी आहे. संशयितांच्या जप्त मोबाइलमधील तांत्रिक माहिती व ‘व्हॉट्सॲप चॅटिंग’ मिळवणे बाकी आहे. संशयित आणि पीडितांमधील संभाषण पुराव्यासाठी संकलित करायचे असल्याने पोलिसांना तपासासाठी वेळ मिळायला हवा, असे सरकारी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
तर सर्व गुन्हे एकाच कंपनीत आणि एकाच ठिकाणी घडल्याने त्यांची स्वतंत्र सुनावणी न घेता एकत्रित सुनावणी व्हावी, असा युक्तिवाद ॲड. कासलीवाल यांनी केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयीन कोठडीतील संशयितांना पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील मुख्य संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी सध्या नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल असून, आठ महिला आणि एका पुरुषाने फिर्याद दिली आहे.
नातेवाइकांचा संताप
न्यायालयाच्या आवारात संशयितांचे नातेवाईक मोठ्या संख्येने हजर होते. यापैकी एका नातेवाइकाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘आमची मुले दोषी असतील तर त्यांना खुशाल फाशी द्या. मात्र या प्रकरणाच्या आडून हिंदू-मुस्लिम वाद उभा केला जात असून, समाजात द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
