बायकोसाठी आईचा जीव घेतला; तोंड दाबून लेकानेच माऊलीला संपवलं; सांगलीतील घटनेनं सगळेच सुन्न

मिरज तालुक्यातील मानमोडी इथं मुलाने पत्नीस घरात ठेवण्यास आईचा असलेला विरोध आणि इतर घरगुती भांडणाच्या रागातून आईचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. मुलाने आईचे नाक आणि तोंड दाबून तिला जीवे मारले असून या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. संगीता जीवन झेंडे असे 51 वर्षीय मयत महिलेचं नाव आहे. याबाबत नातेवाईक बजरंग तुकाराम काशिद यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपी मुलगा जगदीश जीवन झेंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील मानमोडी येथे संशयित जगदीश जीवन झेंडे हा आपल्या आईसोबत राहत होता. त्याची पत्नी सोनाली ही माहेरी राहत होती. सोनालीला घरात ठेवण्यास आईचा विरोध होता, असं सांगितलं जात आहे. यामुळे झालेल्या वादातून आणि घरगुती भांडणाच्या कारणावरून संशयित जगदीशने बुधवारी मध्यरात्री आई संगीता हिला तोंड दाबून जीवे मारल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि ‘आयुष हेल्पलाईन’ टीमच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित जगदीश झेंडे याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या जगदीशने अखेर आपला गुन्हा कबूल केला असून याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *