’50 लाख दिल्याशिवाय सुटका नाही’; कॅफेत गप्पा, प्लॅन्ट दाखवायला नेलं अन् पुढे थेट किडनॅप; देणी वसूल करण्यासाठी मेट्रो कंत्राटदारासोबत खळबळजनक प्रकार

मेट्रो प्रकल्पात काम करणाऱ्या एका कंत्राटदाराला खडी क्रशर प्लॅन्ट दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून, त्याचं भरदिवसा अपहरण केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. ५० लाखांच्या जुन्या वादातून पाच जणांनी व्यावसायिकाला कंटेनरमध्ये डांबून मारहाण केली आणि त्यांच्या वडिलांकडे खंडणी मागितली. मात्र, खराडी पोलिसांनी जीवाची पर्वा न करता अहिल्यानगर रस्त्यावर सिनेस्टाईल पाठलाग करून नाकाबंदी केली आणि गुंडांच्या तावडीतून व्यावसायिकाची सुखरूप सुटका करत पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाने सध्या एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी अटक

या प्रकरणात सागर दत्तात्रय झुरुंगे (३९), विजय सुरेश वाळुंज (३८), राजू विजयकुमार सहाणे (३२), रुपेश शिवाजी गावडे (३८, सर्व रा. लोणीकंद) आणि प्रकाश बाळासाहेब राऊत (३४, रा. तुळापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

किडनॅपरसोबत आधीच होती ओळख

या प्रकरणी गहुंजे येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली आहे. हे व्यावसायिक मेट्रो प्रकल्पात सिव्हिल वर्क करतात. आरोपी झुरुंगे याच्याशी त्यांची ओळख आधीपासून होती. झुरुंगे हा खडी-क्रशर माल पुरवठा करत होता आणि त्याच्याकडे सुमारे ५० लाख रुपये देणे बाकी होते.

त्यादिवशी नेमके काय घडले?

१३ एप्रिलला झुरुंगेने फोन करून व्यवसायिकाला “कामाबद्दल बोलायचं आहे” असं सांगितलं. त्यानुसार १४ एप्रिलला खराडीतील इराणी कॅफेत दोघे भेटले. काही वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर “क्रशर प्लॅन्ट बघायला जाऊया” असं सांगत आरोपींनी त्यांना गाडीत बसवलं. मात्र, हा प्रवास थेट सापळ्यात नेणारा ठरला.

असा होता प्लॅन

खराडी जकात नाका परिसरात गाडी नेण्यात आली. त्याठिकाणी एका कंटेनरमध्ये त्यांना नेण्यात आलं. तिथे आधीपासूनच काही जण थांबलेले होते. अचानक वातावरण बदललं आणि “आजच माझे ५० लाख दे, नाहीतर सोडणार नाही,” अशीधमकी देण्यात आली. त्यांचे मोबाईल बंद करून त्यांना मारहाण करण्यात आली.

‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात’

यानंतर आरोपींनी त्यांना पुन्हा गाडीत बसवलं. त्यानंतर पुणे-अहिल्यानगर मार्गे रांजणगावच्या दिशेने नेलं. मध्येच एका ठिकाणी गाडी बदलून दुसऱ्या वाहनात बसवण्यात आलं, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. दरम्यान, आरोपींनी व्यावसायिकाच्या वडिलांना फोन करून स्पष्ट इशारा दिला “५० लाख दिल्याशिवाय मुलगा सोडणार नाही.” वडिलांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

खराडी पोलिसांनी लगेच कारवाई करत संशयित गाडीचा माग काढला. अहिल्यानगर रोडवरील विजय स्तंभाजवळ नाकाबंदी करून गाडी अडवण्यात आली. गाडीतून अपहरण झालेला व्यावसायिक सुरक्षित सापडला आणि पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, वेळेत कारवाई केल्यामुळे मोठी घटना टळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *