नांदेडमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांवर काळाने घाला घातला. पाण्याचा अंदाज न आल्यानं चारही जणांचा मृत्यू झाला आहे. आज गुरुवारी सकाळी ११ वाजता नांदेड शहरातील देगलूर नाका इस्लामपुरा भागातील हारूनबाग परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जीवरक्षकांनी चारही मुलांना पाण्याबाहेर काढले. मोहम्मद अली (वय १३ वर्ष), मोहम्मद फुरखान (वय १८ वर्ष ), मोहम्मद अदनान (वय ८ वर्ष) आणि मोहम्मद रेहान (वय ११ वर्ष) अस मृतकांची नावे आहेत. मृतकांमध्ये तीनजण एकाच कुटूंबातील असून दोन सख्खे भाऊ असल्याची माहिती आहे. या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं काय घडलं?
देगलूर नाका भागातील हारूनबाग परिसरात एका नाल्याचं काम सुरु आहे. या कामासाठी एका खासगी कंत्राटदाराकडून १० ते १५ फूट खोल खड्डा देखील खोदण्यात आला होता. सद्या काम थांबल्यानं या खड्यात मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलं आहे. आज सकाळी मोहम्मद अली, मोहम्मद फुरखान, मोहम्मद अदनान आणि मोहम्मद रेहान हे चारही जण खेळण्यासाठी जात होते. खड्ड्याजवळ येताच त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. चारही जणांनी कपडे एका चेंबरवर ठेवून सर्वजण पाण्यात उतरले.
गाळ असल्यानं खालीच अडकले
मात्र, पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यानं आणि त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं चारही जण बुडाले. या घटनेची माहिती मिळताच तरुणांनी पाण्यात उतरून चारही जणांना बाहेर काढलं. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अग्निशमन दलाकडून खड्ड्यातील पाणी मोटारीने बाहेर काढण्यात आलं. या भागात महापालिकेकडून खासगी कंत्राटधारामार्फत नाल्याचं काम सुरु आहे. बाजूला प्लॉटिंग आहे. हा खड्डा नेमका खोदला कोणी? याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेला जबाबदार कोण? त्याची चौकशी केली जात आहे.
