भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करत असल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं होतं. विनोदच्या मेंदूत रक्ताची गाठ (ब्लड क्लॉट) निर्माण झाल्यामुळे कधीही ‘ब्रेन स्ट्रोक’ येण्याचा धोका आणि स्मृतीभ्रशांची भीतीही व्यक्त केली जात होती. मात्र विनोदच्या पत्नीने त्याच्या प्रकृतीबाबत वाढत्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. विनोद गंभीर वैद्यकीय समस्यांशी झुंज देत असल्याच्या अफवांचं तिने खंडन केलं आहे.
विनोदच्या पत्नीकडून अफवांचं खंडन
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ झाल्याची माहिती त्याचाच जवळचा मित्र मार्कस कुटो याने दिल्याचे मीडिया रिपोर्ट्स दोन दिवसांपासून चर्चेत आहे. विनोदला कधीही ‘ब्रेन स्ट्रोक’ येण्याचा धोका व्यक्त झाल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. विनोदच्या शारीरिक स्थितीत काहीशी सुधारणा झाली असली, तरी त्याची एकूण प्रकृती नाजूक असल्याचं वर्णन मित्राकडून करण्यात आलं होतं. विनोद कांबळीची पत्नी अँड्रिया ह्युईट हिने मात्र पतीच्या आरोग्याबाबत पसरलेल्या या अफवांचे निरसन केले.
“देवाच्या दयेने, विनोद सुखरुप आहे. त्याच्या प्रकृतीबद्दल चुकीची माहिती कोण पसरवत आहे, हे मला माहीत नाही” असे अँड्रियाने पत्रकार विकी लालवानी यांना सांगितलं.
विनोदच्या मित्रांकडून मदतीचा हात
विनोदच्या जवळच्या मित्रांनी त्याच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम उभारली होती; यामध्ये क्रिकेट क्षेत्रातील अनेकांनी त्याला आर्थिक आणि भावनिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मित्र मार्कस कुटो यांच्या नेतृत्वाखालील एका व्हॉट्सॲप ग्रुपने विनोदच्या सुश्रुषेसाठी योगदान द्यायला हितचिंतकांना एकत्र आणलं होतं. या उपक्रमात सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजांचाही सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे.
विनोद कांबळीला लाईफस्टाईलशी निगडित समस्यांचा सामना करावा लागत असल्याचेही दावे केले जात होते; असं असलं तरी त्याच्या प्रकृतीत सुधारणेची लक्षणे दिसून येत होती. हालचालींमधील सुधारणा आणि पुन्हा हलक्या-फुलक्या व्यावसायिक कामांकडे वळत होता.
विनोदची प्रकृती पाहून चाहते चिंतेत
या वर्षी मार्च महिन्यात, जेव्हा विनोद कंबळी ‘अन्श क्रिकेट ॲकॅडमी’ला गेला होता, तेव्हा तो पुन्हा एकदा चाहत्यांच्या नजरेत आला. त्याची प्रकृती अशक्त आणि नाजूक दिसत होती; इतकंच नव्हे, तर त्याला वावरण्यासाठी अन्य व्यक्तीच्या आधाराचीही गरज भासत असल्याचं पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली होती.
एकेकाळी भारतीय फलंदाजांपैकी सर्वात गुणवान खेळाडूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळीला अलिकडच्या काही वर्षांत आरोग्याच्या समस्यांशी संघर्ष करावा लागला आहे. २०२४ मध्ये मूत्रमार्गाचा गंभीर संसर्ग झाल्याचं त्याने स्वतःच उघड केलं होतं. त्यामुळे तो आपल्या राहत्या घरीच कोसळला होता. आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आपण पुनर्वसन केंद्रात जाण्यास तयार असल्याचंही विनोदने त्यावेळी सांगितलं होतं.
