शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिप्टी सिग्नल परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची ही गंभीर घटना असून या प्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. महेंद्र, धर्मेंद्र आणि सोनू अशी अटकेतील आरोपींची नावे असून तिघेही २२ वर्षीय असून छिंदवाडा येथील रहिवासी आहेत. हे तिघेही सुमारे १५ दिवसांपूर्वी नागपुरात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमना पोलीस ठाण्यात कार्यरत पीएसआय सचिन वाकलेकर हे गुरुवारी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास एका होमगार्ड जवानासह डिप्टी सिग्नल परिसरात नियमित गस्त घालत होते. त्याचदरम्यान काही युवकांनी त्यांना ‘उडता हनुमान चौक’ परिसरात दुचाकीस्वारांमध्ये वाद झाल्याची माहिती दिली. अपघाताच्या कारणावरून सुरू झालेल्या या वादात स्थानिक नागरिकांनी एका संशयिताला पकडून ठेवले होते.
