मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये असलेल्या किल्ल्यांच्या साक्षीने आजही जिवंत आहे. मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आजचा दिवस आहे. आपल्यापैकी अनेकांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे ऐकलं असेल. याच गाण्याचा संदर्भ आजच्याच दिवशी म्हणजे 15 एप्रिलला 1673 साली झालेल्या घडामोडीशी निगडीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज घडलेल्या एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडींवरुन का आणि कोणावर संतापलेले आणि पुढे काय झालं जाणून घेऊयात…
नेमकं काय घडलं आज?
आजच्याच दिवशी 253 वर्षांपूर्वी मराठा सरनौबत (सरसेनापती) प्रतापराव गुजर यांनी आदिलशाही सरदार बहलोलखान पठाण यांच्या विरुद्ध उमराणी येथे मोठी लढाई जिंकली. विजापूरच्या आदिलशाहीकडून बहलोलखान याने 12 हजार स्वारांसह स्वराज्यावर चाल केली होती. त्याने पन्हाळा किल्ला घेरला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांना बहलोलखानला रोखण्यासाठी पाठवले. मराठा सेनेने बिजापूरजवळ उमराणी येथे बहलोलखानच्या छावणीला वेढा घातला. गनिमी काव्याने लढणाऱ्या शिवरायांच्या सैन्याने बहलोलखानाच्या छावणीचा पाण्याचा पुरवठा तोडला आणि सैन्याला उपाशी ठेवले. आजचाच तो दिवस ज्या दिवशी सैन्य उपाशी असल्याने बहलोलखानने करो या मरो म्हणत उघड लढाई केली, पण मराठ्यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला. बहलोलखानला प्रतापराव गुजर यांच्या नेतृत्वाखाली कैद करण्यात आले.
बहलोलखानला का सोडून देण्यात आलं?
युद्धानंतर कैद करण्यात आलेल्या बहलोलखानने स्वराज्यावर पुन्हा आक्रमण न करण्याचे वचन दिल्यावर प्रतापराव गुजर यांनी त्याला आणि त्याच्या सैन्याला धर्मवाट म्हणजेच सन्मानाने सोडून दिले. आदिलशाहाच्या सैन्याकडील सर्व युद्धसामग्री जप्त करण्यात आली. हा सारा घटनाक्रम इतिहासकारांकडून ‘उमराणीचे युद्ध’ म्हणून सांगितला जातो.
शिवरायांनी संतापून लिहिलं पत्र
मात्र मोहिम फत्ते करुन परतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापरावांनी बहलोलखानला सोडल्याबद्दल राग आला होता. महाराजांनी त्यांना कठोर पत्र लिहून जाब विचारला होता. “खानाला ठार मारून यावे, नाहीतर माझ्या समोर येऊ नका,” अशा शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापरावांचे कान टोचले.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’
शिवारायांना आपली कृती आवडली नाही आणि आपल्या हातून चूक झाली याच रागात 24 फेब्रुवारी 1674 रोजी नेसरी येथे प्रतापराव गुजर अवघ्या सहा ते साथ साथीदारांसह बहलोलखानवर चालून गेले आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली. प्रतापराव गुजरांनी काढलेल्या याच सहा सात साथीदारांच्या मोहिमेवरुनच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ म्हणत त्यांच्या कार्याचा गौरव अगदी आजही केला जातो.
