पैशांसाठी गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने घरात घुसून दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली. ही थरारक घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णानगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून एका मारेकऱ्याला अटक केली.
विलास सुभाष चौधरी (वय २५) असे अटकेतील मारेकऱ्याचे तर जितेंद्र संतोष वगारे (वय २५) आणि प्रवीण ढिल्लन चव्हाण (वय २५, सर्व रा. सुराबर्डी वस्ती) अशी फरार मारेकऱ्यांची नावे आहेत. सहेसराम बाजीराव केवट (वय ६०) असे मृताचे नाव आहे.
सहेसराम यांना रिमा व सीमा या दोन मुली आहेत. दोघींचे लग्न झाले असून त्या वाडी भागात राहतात. सहेसराम यांच्या पत्नी यशोदा या आठवा मैल परिसरात वेगळ्या राहतात. चार वर्षांपूर्वी सहेसराम यांना गँगरीन झाले. त्यामुळे त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून कापण्यात आला. ते कुबड्या घेऊन चालतात. त्यांना ग्रामपंचायतीकडून शासकीय मदत मिळायची. एप्रिल महिन्यात त्यांना पैसे मिळाले. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास रिमा, त्यांचे पती, बहीण सीमा व मामेभाऊ कार्तिक हे सहेसराम यांना भेटायला गेले. ‘माझ्या अपंगत्वाचे पैसे मिळाले आहेत. त्या पैशांनी मी नात वैधवीला चांदीचे कडे करून देईन’, असे ते रिमा यांना म्हणाले.
रात्री १०.३० वाजता सर्वजण घरी परतले. सहेसराम यांच्याकडे पैसे असल्याची माहिती विलासला मिळाली. त्याने साथीदारांच्या मदतीने लुटपाटीचा कट आखला. मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास विलास, जितेंद्र व प्रवीण त्यांच्या घरात घुसले. त्यांच्याजवळील पैसे हिसकावले. दोघांनी त्यांना पकडले. विलासने उशीने त्यांचे तोंड दाबले. यात सहेसराम यांचा सहेसराम यांनी त्यांचा प्रतिकार केला. मृत्यू झाला. सहेसराम यांच्या घरातून आवाज येत असल्याने शेजाऱ्याने रिमा यांना माहिती दिली. रिमा, सीमा व त्यांचे नातेवाईक तेथे आले. दार आतून बंद होते.
रिमा व सीमा यांनी सहेसराम यांना आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान विलासने दार उघडले. ‘तू इथे काय करतोस’, अशी विचारणा सीमा यांनी केली. ‘मी दारू पिण्यासाठी आलो होतो’, असे सांगून विलास तेथून पसार झाला. रिमा व त्यांचे नातेवाईक घरात गेले असता सहेसराम बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पैसे गायब होते.
रिमा व सीमा या स्वयंपाकघरात गेल्या असता फ्रिजच्या मागे जितेंद्र तर प्रवीण हा ओट्याखाली लपलेला त्यांना दिसला. दोघींनी मदतीसाठी आरडाओरड केली. दोघांनी त्यांना धक्का देत पळायला लागले. रिमा व सीमा यांनी प्रवीणला पकडले. त्यानेही दोघींना धक्का देत पळ काढला. त्यानंतर रिमा यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच वाडी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी सहेसराम यांना मेयोत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
