महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य असणार आहे. मुंबई शहर हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे शहर आहे. इथे रोजगाराच्या निमित्ताने देशाच्या विविध भागातून नागरीक आले आहेत. तसेच महाराष्ट्राचा भूमिपुत्र असणारे मुंबईकर हे देखील मुंबईत वास्तव्यास आहेत. मराठी ही महाराष्ट्राची राज्य भाषा आहे. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्यांना मराठी भाषा बोलता येणं हे सर्वांसाठी सोयिस्कर आहे. असं असलं तरी अनेकजण मराठी भाषेला कमी लेखण्यासाठी मराठी समजत असूनही मराठी समजत नाही किंवा मराठी बोलणार नाही, असं उद्धटपणे बोलतात. यामध्ये काही रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे याआधी मराठी भाषा बोलणार नाही, असं ठासून सांगणाऱ्या एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण आता अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना घरी बसावं लागणार आहे. कारण त्यांचा परवानाच रद्द होणार आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालवायची असेल तर मराठीचं ज्ञान असणं बंधनकारक असणार आहे. येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून याबाबतची कठोर कारवाई करण्यास सुरुवात होणार आहे.
येत्या 1 मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहेत. संबंधित चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येते का? याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
