‘पहाड़ोंवाली मॅगी’ म्हणजे भन्नाट बिझनेस आयडिया! काही तासांची कमाई महिन्याच्या पगाराहूनही जास्त

पर्वत आणि भटकंती… हे समीकरण वेगळं करणं तसं कठीणच. निसर्गाचे बहुविध चमत्कार पाहायचे असल्यास पर्वतीय राज्यांना एकदातरी भेट द्या, असा सल्ला बरीच मंडळी देतात. काहीजण तर या पर्वतीय राज्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. अशा या भटकंतीदरम्यान काही गोष्टी या अलिखित नियमाप्रमाणे पाळल्या जातात. उदाहरणार्थ, कडाक्याच्याच्या थंडीमध्ये आईस्क्रीम खाणं, अतिशय उंच ठिकाणी हुडहूडी भरलेली असताना वाफाळते मोमोज खाणं, भुरके मारत वाफाळता चहा पिणं आणि अर्थातच डोंगरदऱ्यांच्या कुशीत असताना कुठंतरी लहानशा स्टॉलवर जाऊन तिथं गरमागरम मॅगीचा आस्वाद घेणं. हीच मॅगी विकणारी मंडळी किती कमाई करत असतील काही कल्पना आहे?

डोंगरदऱ्यांमध्ये भटकंतीसाठी जाणारी मंडळी त्यांच्या संपूर्ण प्रवासात एकदातरी अशा मॅगीचा आस्वाद घेतात. काहीजण न चुकता या मॅगीसह Background मध्ये पर्वत दिसतील असे फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करतात, जणू काही #शास्त्रअसतंते! काहींच्या मते थंडीच्या ठिकाणी आणि अगदीच फिल्मी भाषेत सांगावं तर, ‘मॅगी का असली मजा तो पहाडों मे ही आता है| ‘. पण, कधी विचार केला आहे का, ही वाफाळती मॅगी विकणाऱ्या मंडळी किती कमाई करतात?

एका युट्यूबरनं सोपं करुन सांगितलंय गणित… 

सहसा बरेच युट्यूबर मंडळी सोशल मीडियावर अनेक Challanges स्वीकारत असतात. असंच चॅलेन्ज yeah_badal नावाचं अकाऊंट चालवणाऱ्या इन्स्टाग्रामरनं स्वीकारलं. त्यानं एक कमाल व्हिडीओ केला, जिथं फार काही नाही फक्त मॅगी बनवून विकली. साधारण 70 रुपयांना एक प्लेट मॅगी अशा दरानं त्यानं विक्री केली. त्यानंच सांगितल्यानुसार काही तासांमध्ये साधारण 300 मॅगींची विक्री केली. सोपं गणित केल्यास 70 रुपयांच्या हिशोबानं 300 प्लेट मॅगी म्हणजे त्यानं दिवसातील काही तासांतच 21 हजार रुपयांची कमाई केली.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा अनेकांनीच मॅगीच्या चवीपेक्षा या तरुणानं दाखवलेल्या कमाईच्या मार्गाकडे लक्ष वळवलं. यानं तर एक भन्नाट बिझनेस आयडिया दिली, आता नोकरी नको पर्वतांमध्ये जाऊन मॅगी विकू असंच नेटकरी म्हणू लागले. भटकंतीसाठी गेल्यावर मित्रमंडळींमध्ये बसलं की, ‘चला यार, मॅगीचा स्टॉल टाकू’ असं म्हणत बऱ्याचदा असे मजेशीर बिझनेस प्लान बनतात आणि ते तिथंच राहतात. मात्र या तरुणानं प्रत्यक्षात हा प्लान केला आणि त्याचा निष्कर्ष सर्वांनाच आनंद देऊन गेला असं म्हणणं गैर ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *