वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन 10 ठार; 23 जखमी; काही कामगार अडकल्याची भीती

छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. साकती जिल्ह्यातील वीज प्रकल्पात मंगळवारी झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून, 23 हून अधिक जण जखमी झाले आहेत. काह कामगार या ठिकाणी अडकले असावेत अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिंहितराई गावातील ‘वेदांता लिमिटेड’च्या वीज प्रकल्पातील एका बॉयलर ट्यूबमध्ये दुपारच्या सुमारास हा स्फोट झाला.

स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही कामगार अद्यापही अडकल्याची भीती असल्याने बचावकार्य सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

“14 एप्रिलच्या दुपारी, आमच्या सिंहितराई येथील प्रकल्पातील एका बॉयलर युनिटवर  दुर्दैवी घटना घडली. या घटनेत, सदर युनिटचं संचालन आणि देखभाल करणाऱ्या आमचे उप-कंत्राटदार असलेल्या ‘NGSL’ कंपनीचे कर्मचारी सहभागी होते. या घटनेमुळे बाधित झालेल्यांना वैद्यकीय मदत आणि उपचार मिळतील, याची आम्ही खात्री करत आहोत,” असं वीज प्रकल्पाच्या एका प्रवक्त्याने सांगितलं आहे.

“आम्ही जखमींना सर्वतोपरी सहकार्य करत आहोत. वैद्यकीय पथकं व स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे. आम्ही घटनेचा सविस्तर तपशील जाणून घेता आहोत. तसंच, आमचे भागीदार आणि संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे,” असंही प्रवक्त्याने सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही दुर्देवी घटना आहे असं सांगत पीडितांसाठी 2 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. “छत्तीसगडमधील वीज प्रकल्पात घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना मदत करत आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येक मृताच्या निकटच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत दिली जाईल. तसंच, जखमींना 50 हजार दिले जातील,” असं त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी या घटनेचे वर्णन अत्यंत क्लेशदायक आणि हृदयद्रावक असं केलं आहे. “या अपघातात काही कामगारांचा मृत्यू झाल्याची आणि काही जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेते. जिल्हा प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून, मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. जखमींवर उत्तम उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *