मुंबईकरांवर जलसंकट! अर्ध्या तासाचा ‘पॉवर कट’ मुंबईकरांना भारी पडला; गिरगाव, खारसह अनेक नळांना खडखडाट, पुरवठा सुरळीत कधी होणार?

मुंबईत सध्या उन्हाचा पारा चढलाय, घामाच्या धारा वाहत आहेत आणि अशातच मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळवणारी एक बातमी समोर आली आहे. पडघा वीज उपकेंद्रात झालेल्या एका तांत्रिक बिघाडाने अख्ख्या मुंबईकरांना संकटात टाकलं आहे. पिसे आणि पांजरापूर ही महत्त्वाची जलशुद्धीकरण केंद्रं वीज नसल्याने ठप्प झाली आणि बघता बघता मुंबईच्या पाणीपुरवठ्याचं गणितच बिघडलं. आता या तांत्रिक घोळामुळे पालिकेला शहरात २० ते २५ टक्के पाणीकपात लागू करावी लागली आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी संध्याकाळी ५:४५ ते ६:१५ फक्त ही ३० मिनिटं मुंबईकरांना भारी पडली आहेत. पडघा उपकेंद्रातील वीज पुरवठा या अर्ध्या तासासाठी खंडित झाला, पण त्याचा परिणाम एवढा मोठा झाला की मुंबई टप्पा १ आणि २ चा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. मुख्य संतुलन जलाशयातील पाण्याची पातळी खालावल्याने आता पालिकेवर कपातीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ही पाणीकपात बुधवारी रात्री ९ वाजेपर्यंत कायम राहणार असल्याने मुंबईकरांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा लागणार आहे.

गिरगावात पहाटेच पाणीबाणी

या तांत्रिक बिघाडाचा सर्वात मोठा फटका गिरगावला बसला. पहाटे ४:३० च्या सुमारास ज्यावेळी गृहिणी पाणी भरण्यासाठी सज्ज असतात, पण आज यावेळी नळाला पाण्याचा पत्ताच नव्हता. “सकाळी कामाची घाई असते, मुलांच्या शाळा असतात, अशा वेळी नळ कोरडे राहिल्याने आमची मोठी धावपळ उडाली,” अशा शब्दांत गिरगावच्या गृहिणींनी आपला संताप व्यक्त केला. ऐन उन्हाळ्यात पाणी नसल्याने जनजीवन पार विस्कळीत झालं आहे.

खार दांडा कोळीवाड्यात हाल

खार दांडा कोळीवाडा परिसरात तर आधीच लो-प्रेशरच्या पाण्याची ओरड असते, त्यात या बिघाडाने आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. स्थानिक नगरसेवक चिंतामणी निवाते यांनी सांगितलं की, “पाणी येतंय पण त्याला प्रेशरच नाही, मग ते लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार कसं?” वाढत्या उकाड्यामुळे नागरिक आधीच हैराण असताना आता पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागत आहे.

प्रशासनाचा दावा

पालिका प्रशासनाने ‘परिस्थिती नियंत्रणात आहे’ असं म्हणत रात्री ९ नंतर पुरवठा सुरळीत होईल, असा दावा केला असला तरी तोपर्यंत मुंबईकरांची मोठी परीक्षा पाहणारं हे जलसंकट ठरणार आहे. तांत्रिक बिघाड जरी दुरुस्त झाला असला तरी जलाशयाची पातळी पुन्हा भरून काढायला वेळ लागतोय, तोवर मुंबईकरांना या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *