डॉ. आंबेडकर जयंती सोहळ्याला नागपूरला गेला, परतीच्या वाटेवर अनर्थ; भंडाऱ्यातील तरुण ठार, 4 मित्र गंभीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी रात्री नागपुरात आयोजित मुख्य सोहळ्यावरून गावाकडे परतणाऱ्या युवकांच्या कारला बेला गावाजवळ भीषण अपघात झाला. यात अड्याळ परिसरातील सोनू उर्फ चंद्रकांत डोंगरे या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचे अन्य चार मित्र गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे तिर्री आणि अड्याळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अड्याळजवळील तिर्री गावात सोमवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली होती. ही रॅली आणि गावातील जेवण आटोपून सोनू उर्फ चंद्रकांत डोंगरे आपल्या पाच मित्रांसह कारने नागपूर येथील मुख्य सोहळा पाहण्यासाठी रात्री १० ते १०.३० वाजतादरम्यान रवाना झाला होता.

बेलाजवळ झालेल्या या भीषण अपघातात कारमधील अन्य चार मित्र गंभीर जखमी झाले आहेत. यात साजिद मुस्तफा पठाण (१८) रा. अड्याळ, क्रिश भिवाजी जिभकाटे (१९) रा. चिचाळ, अभिषेक दीपक बन्सोड (३०) रा. तिर्री, आयुष भास्कर कावळे (२४) रा. तिर्री यांचा समावेश आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार
दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर तिसरा गंभीर जखमी झाला. ही घटना पवनी मार्गावरील पालोरा चौरास येथे मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. धनंजय गजानन भानारकर (३८) रा. पिंपळगाव निपानी आणि राजेश चेपा गजभिये (४५) रा. बोरगाव/खांबाडी अशी मृतांची नावे आहेत. धनंजय हे सहकारी मित्र सचिन नारायण गाडेकर रा. पिंपळगाव निपानी व राजेश गजभिये यांच्यासह मोटारसायकल क्र. एमएच ३१ बी. वाय. ९९२३ने पवनी येथे जात असताना पालोरा चौरास येथे मागेहून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात धनंजय व राजेश यांचा मृत्यू झाला तर सचिन गाडेकर हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *