मोठ्या हौसेने लेकीचं कन्यादान केलं, पण लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच तिचा असा करुण अंत होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असा हृदयद्रावक टाहो फोडत एका हतबल पित्याने आपल्या मुलीच्या मृत्यूला सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. खुलताबाद तालुक्यातील धामणगाव तांडा येथे २७ वर्षीय विवाहितेने विषारी द्रव्य घेतल्याने संशयास्पद मृत्यू झाला असून, लग्नानंतर अवघ्या चार वर्षांत मुलीबाबत असं घडल्याने खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
वडिलांचा दावा
प्रमिला दिनेश राठोड २७ अस संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला यांचा विवाह ४ वर्षांपूर्वी दिनेश राठोड यांच्याशी झाला होता. संसाराची सुरुवातीची काही वर्षे सुखात गेली, मात्र त्यानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून प्रमिला यांचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे प्रमिला खचून गेल्या होत्या.
११ एप्रिल रोजी त्यांना विषारी द्रव्य पाजण्यात आल्याचा दावा त्यांचे वडील नामदेव चव्हाण यांनी पोलीस तक्रारीत केला आहे.
दोन चिमुकल्यांचं छत्र हरपलं
उपचार सुरू असतानाच १३ एप्रिल रोजी प्रमिला यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात ३ वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षांची मुलगी असा परिवार आहे. आईच्या मृत्यूमुळे या निष्पाप चिमुकल्यांचे छत्र हरपले असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिसांनी पती दिनेश राठोड, सासू निर्मलाबाई राठोड यांच्यासह सात जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सोमवारी सायंकाळी चोख पोलीस बंदोबस्तात प्रमिला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
